जळगाव लाईव्ह न्यूज । प्रा. डॉ. सुरेश माधवराव मुंढे व डॉ. वरुणराज राजेंद्र नन्नवरे यांची वर्ष २०२५-२६ साठी अनुक्रमे देवगिरी प्रदेश अध्यक्ष व प्रदेश मंत्री म्हणून निवड करण्यात आली आहे. अभाविपच्या प्रदेश कार्यालयातून निर्वाचन अधिकारी प्रा. डॉ. राहुल कुलकर्णी यांनी नूतन पदाधिकाऱ्यांची घोषणा केली. त्यांचा कार्यकाळ एक वर्ष असेल. दोन्ही पदाधिकारी दिनांक २३ जानेवारी २०२६ ला हिंगोली येथे होणाऱ्या ६० व्या हीरक महोत्सवी देवगिरी प्रदेश अधिवेशनात आपली जबाबदारी स्वीकारतील.

प्रा. डॉ. सुरेश माधवराव मुंढे यांचे शिक्षण हिंदी विषयात पदव्युत्तर पदवी, नेट, एम.फिल. तसेच विद्यावाचस्पती पदवी पर्यंत पूर्ण झाले आहे. मूळ गंगाखेड, जिल्हा परभणी येथील कार्यकर्ते आहेत. २००७ पासून संत सावता माळी महाविद्यालय, फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर येथे हिंदी विषयाचे प्राध्यापक म्हणून ते कार्यरत आहेत. रशिया व मॉस्को येथे झालेल्या अंतराष्ट्रीय चर्चासत्राच्या निमित्ताने त्यांनी विदेश यात्रा देखील केली आहे. त्यांना तीन राष्ट्रीय पुरस्कारांनी देखील सन्मानित करण्यात आले आहे. त्यांचे हिंदी साहित्यातील विविध १८ पुस्तके प्रकाशित झालेले आहेत तसेच व राष्ट्रीय व अंतराष्ट्रीय नियतकालिका मधून ५५ शोध निबंध प्रकाशित केली आहेत.

मराठवाडयातील विद्यार्थी चळवळ सक्षम बनविण्यामध्ये त्यांनी महत्वाची भुमिका निभावाली आहे. शिक्षण क्षेत्रामधील नाविण्यपूर्ण प्रयोग व उपक्रमांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. २००१ पासून विद्यार्थी परिषदेच्या कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग आहे. यापूर्वी त्यांनी छत्रपती संभाजीनगर महानगर अध्यक्ष, छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रमुख, छत्रपती संभाजीनगर विभाग प्रमुख, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अश्या जबाबदाऱ्यांचे निर्वाहन त्यांनी केलेले आहे. वर्ष २०२५-२६ साठी त्यांची देवगिरी प्रदेश अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांचा निवास छत्रपती संभाजीनगर येथे आहे.

नूतन प्रदेश मंत्री डॉ. वरुणराज राजेंद्र नन्नवरे मूळ जळगाव येथील कार्यकर्ते आहेत. ते २०१८ पासून विद्यार्थी परिषदेच्या कार्यात असून सध्या डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे एम.बी.बी.एस. प्रशिक्षण कालावधी पूर्ण करत आहेत. त्यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठावर काढण्यात आलेल्या वसतिगृह शुल्क वाढ, परीक्षा व मूल्यमापन मधील अनियमितता विरोधातील संघर्ष अशा विविध आंदोलनाचे यशस्वी नेतृत्व केले आहे. तसेच पश्चिम बंगाल मधील संदेशखाली तसेच आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालय येथे विद्यार्थींनीवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधातील आंदोलन, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यात बदल करून विद्यापीठाच्या स्वायतत्ते वर घाला घालणाऱ्या महाराष्ट्र सरकार विरोधातील आंदोलनाचे त्यांनी यशस्वी नेतृत्व केले आहे.
शैक्षणिक वर्ष २०२३-२४ व २०२४-२५ मध्ये झालेल्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषद निवडणुकीतील अभाविपच्या विजयात त्यांची महत्वपूर्ण भूमिका राहिली आहे. देवगिरी प्रदेशातील ग्रामीण व जनजाती भागात तसेच शहरातील सेवावस्ती मध्ये विविध आरोग्य तपासणी शिबिराच्या माध्यमातून वैद्यकीय विद्यार्थ्यांमध्ये समाजभान आणि सेवाभाव जागृत करण्यामध्ये त्यांची महत्वाची भूमिका राहिली आहे. भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद, दिल्ली च्या अंतर्गत ‘ग्रामीण भागातील महिलांमध्ये लोहमात्रा कमतरता व ॲनिमिया’ या विषयावरील संशोधन प्रकल्प त्यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे. यापूर्वी जळगाव महानगर मेडीव्हिजन सह संयोजक, मेडीव्हिजन देवगिरी प्रदेश सह संयोजक, मेडीव्हिजन राष्ट्रीय समिती सदस्य, देवगिरी प्रदेश सहमंत्री अश्या जबाबदाऱ्यांचे निर्वाहन त्यांनी केले आहे. वर्ष २०२५-२६ साठी त्यांची देवगिरी प्रदेश मंत्री म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांचा निवास जळगाव येथे आहे.






