गुन्हेभुसावळ

भुसावळ : बेदम मारहाणीत कैद्याचा मृत्यू, तुरूंग अधीक्षकांसह पाच जणांविरोधात गुन्हा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० मार्च २०२२ । मुक्ताईनगर तालुक्यातील चांगदेव येथील वॉरंटमधील आरोपीला भुसावळ दुय्यम कारागृहात आणल्यानंतर तुरूंग अधीक्षकांसह तुरूंग रक्षकांनी त्यांना बेदम मारहाण केली होती. या घटनेत सुनील भागवत तारू (40, चांगदेव, ता.मुक्ताईनगर) या कैद्याचा मृत्यू झाला होता. 1 ते 4 मार्च 2020 दरम्यान घडलेल्या या घटनेप्रकरणी तब्बल दोन वर्षानंतर भुसावळातील तत्कालीन तुरूंग अधीक्षकांसह चार तुरूंग रक्षकांविरोधात भुसावळ शहर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

बेदम मारहाणीत कैद्याचा अति रक्तस्त्रावाने मृत्यू
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चांगदेव येथील सुनील भागवत तारू (40, चांगदेव, ता.मुक्ताईनगर) यांना मुक्ताईनगर न्यायालयाच्या आदेशानुसार 29 फेब्रुवारी 2020 रोजी मुक्ताईनगर पोलिसांनी अटक केली होती व न्यायालयाच्या आदेशानुसार तारू यांना भुसावळ दुय्यम कारागृहात हलवण्यात आले होते. तारू यांची प्रकृती अस्वस्थ झाल्यानंतरही त्यांच्यावर वेळीच औषधोपचार करणे गरजेचे असताना कारागृहातील तुरूंग रक्षकांनी त्यांना बेदम मारहाण केली तसेच डोक्यावर व ढोपरावर कोणत्यातरी वस्तूने हल्ला चढवल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला होता व 4 मार्च 2020 रोजी त्यांना उपचारार्थ हलवल्यानंतर त्यांचा मृत्यू ओढवला होता. सुरुवातीला या प्रकरण अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली मात्र शवविच्छेदन अहवालाच्या निष्कर्षानंतर पोलिसांनी या प्रकरणी आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला.

तुरूंग अधीक्षकांसह पाच जणांविरोधात गुन्हा
सुनील तारू यांचा भुसावळातील दुय्यम कारागृहात झालेल्या मृत्यू प्रकरणी मयताची पत्नी मंगला सुनील तारू (35, चांगदेव, ता.मुक्ताईनगर) यांनी भुसावळ शहर पोलिसात मंगळवारी दिलेल्या फिर्यादीनुसार तत्कालीन तुरूंग अधीक्षक नागनाथ महादेव भानोसे, तुरूंग रक्षक व हवालदार सुभाष बाबूराव खरे, हवालदार भानुदास निवृत्ती पोटे, सीताराम विठ्ठल कदम, अनिल श्रीराम बडगुजर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गजानन पडघण करीत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button