पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ट्विटर अकाउंट हॅक, बिटकॉइनबद्दल केले ट्वीट
जळगाव लाईव्ह न्यूज । १२ डिसेंबर २०२१ । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वैयक्तिक सोशल मिडिया खाते असलेले @narendramodi हे ट्विटर अकाउंट रात्री २ च्या सुमारास हॅक झाले होते. हॅकरने बिटकॉइनला अधिकृतपणे मान्यता देत असल्याचे टि्वट केल्याने खळबळ उडाली होती. मात्र, आता नरेंद्र मोदी यांचे ट्विटर हँडल रिस्टोअर करण्यात आले असून ते ट्विट डिलीट करण्यात आले आहेत.
पंतप्रधानांच्या अधिकृत ट्विटर अकाउंट पीएमओ इंडियाने ट्विट करून ही माहिती दिली आहे. त्यांनी लिहिले की, पंतप्रधानांचे ट्विटर हँडल @narendramodi खाते काही काळासाठी हॅक झाले होते. हे प्रकरण ट्विटरपर्यंत पोहोचले आणि लगेचच खाते सुरक्षित करण्यात आले आहे. या कालावधीत केलेल्या ट्विटकडे दुर्लक्ष करण्यात यावे, असे पीएमओकडून सांगण्यात आले आहे.
हॅकरने म्हटले होते की, भारताने बिटकॉइनला अधिकृतपणे कायदेशीर मान्यता दिली आहे. सरकारने अधिकृतपणे ५०० BTC विकत घेतले आहे. दरम्यान, आम्ही ते देशातील सर्व नागरिकांना वितरित करत आहे. जल्दी करें india…… भविष्य आज आया है!’ अशा आशयाचे ट्विट करत हॅक केल्याचे समोर आले आहे. दरम्यान, अवघ्या दोन मिनिटांत हे ट्विट डिलीट करण्यात आले. लगेच दुसरे ट्विट अवघ्या दोन मिनीटांमध्ये प्रसिद्ध करण्यात आले.
पंतप्रधान मोदींचे वैयक्तिक वेबसाईटचे ट्विटर अकाउंट यापूर्वी देखील हॅक झाले आहे. हॅकरने कोविड-19 रिलीफ फंडासाठी डोनेशन म्हणून बिटकॉइनची मागणी केली होती. मात्र, तत्काळ हे ट्विट्स डिलीट करण्यात आले. कोविड-19 साठी निर्माण करण्यात आलेल्या पंतप्रधान मोदी रिलीफ फंडात देणगी द्या, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांच्या व्यक्तिगत वेबसाइटच्या या ट्विटर अकाउंटवर करण्यात आले होते.