सर्वसामान्यांना झटका ! ऐन सणासुदीत नारळासह खोबऱ्याचे दर गगनाला भिडले..

ऑगस्ट 21, 2025 1:26 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ ऑगस्ट २०२५ । पुढील आठवड्यात गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. गणेश चतुर्थीला केवळ मोजकेच दिवस बाकी असताना बाजारात नारळाचे दर गगनाला भिडले आहेत. एका नारळाची किंमत आकाराप्रमाणे ४० ते ४५ रुपयांपर्यंत पोहोचली आहे. नारळासह सुके खोबरे आणि खोबरेल तेलाचे भाव गगनाला भिडले असून, सर्वसामान्यांचे सणासुदीच्या खर्चाचे गणित बिघडले आहे. या महागाईन बजेट कोलमडल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे.

naral

दि. २७ ऑगस्ट रोजी गणरायांचे आगमन असल्यामुळे मोदक बनविण्यात मिठाईघर चालक गुंतले आहेत. विशेषतः खोबऱ्यांच्या मोदकाला मोठी मागणी असते. शिवाय या दिवसांत नारळाची मागणी सुद्धा अनेक पटीने वाढलेली असते. गणेशोत्सवानंतर नवरात्र आणि पुढे दिवाळी असे मोठे सण आहेत. या दरम्यान, अनेक छोटे व प्रादेशिक सण सुद्धा येतात. परंतु, सध्या भाव वाढल्याने देवाला नारळ कसा अर्पण करायचा आणि मिठाईमध्ये खोबरे कसे वापरायचे, असा प्रश्न गृहिणींना पडला आहे. यामुळे अनेक घरांमध्ये सणासुदीच्या पारंपरिक पदार्थांचे प्रमाण घटले आहे.

काय आहेत भाव ?

दरम्यान सणासुदीच्या हंगामात नारळाला नेहमीच मागणी वाढते, पण यंदा किमतीने उच्चांक गाठला आहे. पूर्वी ३० ते ३५ रुपयांना मिळणारा ओला नारळ आता थेट ४० ते ४५ रुपये प्रतिनग दराने विकला जात आहे. तर नारळ पाण्याचे दरही मोठ्या प्रमाणात वाढलेले दिसून येत आहे. जळगाव शहरात एका नारळासाठी ६० ते ७० रूपये मोजावे लागत आहे. त्याचप्रमाणे, ३०० रुपये किलोच्या आसपास असलेले सुके खोबरे आता ४०० ते ४४० रुपये किलोपर्यंत पोहोचले आहे. या अभूतपूर्व दरवाढीमुळे खरेदी करताना ग्राहक विचार करत आहेत.मागच्या दोन महिन्याच्या तुलनेत नारळ आणि खोबऱ्याच्या दरात दुप्पट वाढ दिसून येत आहे.

दरवाढीचे कारण काय?

नारळ-खोबऱ्याच्या या महागाईमागे अनेक कारणे आहेत. प्रमुख नारळ उत्पादक राज्यांमध्ये (उदा. केरळ, कर्नाटक) यंदा कमी उत्पादन झाले आहे. काही भागांमध्ये नारळाच्या झाडांवर किडींचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनाला मोठा फटका बसला आहे. याशिवाय, आयात शुल्कात झालेली वाढ आणि सणासुदीमुळे वाढलेली मागणी यामुळे दरात प्रचंड वाढ झाल्याचे बोलले जात आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now