जळगाव लाईव्ह न्यूज | १९ जानेवारी २०२३ | जामनेर तालुक्यातील गोद्री येथे पाचशे एकर क्षेत्रात अखिल भारतीय हिंदू गोर बंजारा व लबाना नायकडा समाज कुंभाच्या तयारीला वेग आला असून भाविकांच्या निवास व्यवस्थेसाठी सात नगरांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामध्ये पन्नास हजार भाविकांच्या निवासाची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच दिवसभरात कुंभमेळ्यात येणार्या दीड लाख भाविकांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यासाठी भोजन तयार करण्यासाठी सात मोठी स्वयंपाक घरे उभारण्यात आली आहेत.
चोवीस तास भोजन व्यवस्था
गोद्री येथील कुंभमेळ्यात दाखल होणार्या भाविकांसाठी चोवीस तास अन्नक्षेत्रात भोजनाची व्यवस्था असणार आहे. कुंभस्थळी मुख्य सभामंडपाच्या समोरील बाजूस ही भाविकांसाठी भोजनाची व्यवस्था आहे. त्यात दररोज दीड लाखापेक्षा अधिक भाविक दिवसभरात भोजन करतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
चार हेलीपॅडची उभारणी
सहा दिवसीय कुंभासाठी देशभरातून विविध राष्ट्रीय संत, राजकीय नेते, मंत्री तसेच विशेष अतिथी येणार आहे. येणार्या प्रमुख पाहुण्यांच्या सोयीसाठी चार हेलीपॅडची उभारणी करण्यात येत आहे.
महिलांसाठी स्वतंत्र नगराची निर्मिती
कुम्भासाठी दहा लाख भाविक तेलंगाना, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक व महाराष्ट्र या राज्यातून येणार आहेत. त्यांच्या सोयीसाठी सात नगरांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यापैकी एक स्वतंत्र नगर महिलांसाठी असणार आहे. तसेच अडीच ते तीन हजार महिलांसाठी राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या नगरात मंडपात निवास व्यवस्थेसह अंघोळीसाठी स्नानगृहे साकरण्यात येत आहेत. त्यात पिण्याच्या पाण्यासह अत्याधुनिक पध्दतीच्या शौचालयाची उभारणी करण्यात आली आहे.
अडीचशे एकर मंडपासह सहा डोम नव्वद संत कुटीया
अडीचशे एकरच्या मंडपातील गोद्री कुंभात सहा डोम व नव्वद संत कुटीया उभारण्याचे काम सुरू आहे. त्यात मुख्य सभागृहाचा डोम जर्मन हँगर उज्जैन येथून येणार आहे. कुंभात सभा मंडपाचा डोम हा मुख्य डोम असणार आहे. याठिकाणी विशेष मान्यवर येणार असल्याने त्यादृष्टीने त्यांची उभारणी करण्यात येणार आहे.
धार्मिकस्थळी गुरूव्दाराच्या लंगर कडून होणार अन्नदान
बचत गटाच्या स्टॉलची उभारणी गोंद्री येथील धार्मिक स्थळाच्या ठिकाणी बचत गटाच्या स्टॉलला जागा देण्यात आली आहे. त्यात 200 बचतगट आपल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन लावणार आहे. धार्मिक स्थळी मंदिराच्या मागच्या बाजूला केंद्रीय कार्यालय असणार आहे. धार्मिक स्थळांच्या ठिकाणी अमृतसर, नांदेड येथील गुरूव्दाराच्या माध्यमातून भाविकांसाठी प्रसादाचे लंगर लावण्यात येणार आहेत.
दोन हजार पोलीसांचा बंदोबस्त…
कुंभात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता याठिकाणी दोन हजार पोलिसांचा बंदोबंस्त तैनात करण्यात येणार आहे. याशिवाय अग्निशामक दल, रुग्णवाहिका, रुग्णालय अश्या व्यवस्थाही करण्यात आल्या आहेत. तसेच मोबाईल कॉनेक्टीविटी साठी बीएसएनएल कडून तात्पुरत्या स्वरूपाचे मोबाइल टॉवरची उभारणी करण्यात येणार आहे.