जळगाव लाईव्ह न्यूज । ४ मे २०२६ । गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या कडाक्याच्या उन्हापासून अखेर नागरिकांना दिलासा मिळण्याची चिन्हं आहेत. भारतीय हवामान विभागाने (IMD) आजपासून राज्यात मान्सूनपूर्व पावसाची शक्यता वर्तवली असून येत्या ७ मे पर्यंत अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला आहे. ‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’च्या प्रभावामुळे मध्य भारतात हवामानात मोठा बदल होत असून, याचे थेट परिणाम महाराष्ट्रावर दिसून येत आहेत.

सध्या संपूर्ण राज्यात कडाक्याचे ऊन पडत असून नागरिक उन्हाच्या तीव्र झळांनी होरपळून निघाले आहेत. जळगावसह अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या पार गेला आहे. मात्र, अशा परिस्थितीत आता राज्यातील जनतेला दिलासा देणारी मोठी खुशखबर आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, विदर्भाक ४ ते ७ मे दरम्यान जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. महत्वाचं म्हणजे नागपूर आणि संपूर्ण विदर्भात येत्या २ ते ३ दिवसात हवामानात मोठा बदल होऊ शकतो.

‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’च्या प्रभावामुळे मध्य भारतात या बदलाचा परिणाम दिसून येईल. तसेच काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस तर काही ठिकाणी जोरदार सरी कोसळू शकतात. चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. विजांच्या कडकडासंह गारपिटीचीही शक्यता आहे. मराठवाड्यात ५ ते ७ मे दरम्यान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पण कोकणात सध्या पावसाची शक्यता नसल्याचं हवामान विभागाने स्पष्ट केलं आहे.
एकिकडे विदर्भ-मराठवाड्याला पावसाचा इशारा मिळणार असताना, जळगाव जिल्ह्यात मात्र उष्णेतच तडाखा कायम आहे. जळगावात सध्या उत्तर भारताकडून येणाऱ्या अतिउष्ण आणि कोरड्या हवेचा प्रभाव वाढला आहे. परिणामी रविवारी पारा ४२.६ अंशांवर होता. येत्या ४ ते ६ मे दरम्यान तो ४३ अंशांपुढे जाण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात सध्या कुठलाच पावसाचा अंदाज नसल्याने उष्णतेच्या तडाख्यातून जळगावकरांना दिलासा मिळण्याची चिन्हे कमीच आहे






