सकारात्मक विचाराच्या माध्यमातून जीवनाला आकार देता येतो – अजित देशपांडे
जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मार्च २०२२ । सकारात्मक उर्जा असणारी युवा पिढी घडवणे काळाची गरज आहे. विज्ञान तंत्रज्ञानाच्या विकासाने सतत बदलत जाणारी साधने निर्माण केलीत. मानवी जीवनाला या सराव बाबींनी निश्चितच समृद्ध केले, परंतु कुठे तरी मूल्यांचा ऱ्हास देखील होत गेला. विद्यार्थ्यांचे आद्य कर्तव्य हे विद्यार्जन करणे आहे. सोबत त्यांनी आपला बाह्यगत विकास करावा, सामजिक भान जपावे, प्रचंड वाचन करावे, जीवन समृद्ध करणारे लेखन करावे. आपल्या जगण्यातल्या जीवनविषयक मूल्यांचे महत्व समजून आपल्या भविष्याला आकार द्यावा.’ असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे माजी उच्च माध्यमिक शिक्षण सहसंचालक अजित देशपांडे यांनी मूळजी जेठा महाविद्यालयात आयोजित परिसंवादामध्ये केले.
माजी विद्यार्थी संघ, राष्ट्रीय सेवा योजना आणि एन.सी.सी. च्या वतीने महाविद्यालयात मू.जे. महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि महाराष्ट्र राज्याचे माजी उच्च माध्यमिक शिक्षण सहसंचालक अजित देशपांडे, पुणे आणि प्रसिद्ध वकील आणि सामाजिक कार्यकर्ते गोपाल गुणाले, पुणे यांचा विद्यार्थ्यांसोबत ‘युवा पिढी आणि सामाजिक-शैक्षणिक बोध विषयावर परिसंवाद’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमात प्रमुख वक्ते असलेले गोपाल गुणाले यांनी म्हटले की ‘तरुण मन हे चंचल असते, त्यात गांभीर्य वयाच्या एका विशिष्ट टप्प्यावर येते. विविध विषयावर त्यांचे चिंतन प्रगल्भ होण्यासाठी त्यांना सामाजिक कार्याचा अनुभव असणे गरजेचे आहे. समाजाचा चेहरा मोहरा बदलण्याची प्रचंड उर्जा आणि क्षमता तरुण पिढीमध्ये असते. त्यातही ते विधायक आणि सकारात्मक वृत्तीचे हवेत. जग बदलणारी पिढी वैचारिक आणि कृतीशील लोकांच्या मार्गदर्शनामुळे घडते. त्या त्या काळात आसे मार्गदर्शक आणि आदर्श व्यक्ती झालेले आहेत. त्यांचा आदर्श जपला पाहिजे, त्यासाठी युवापिढीने आपला दृष्टीकोन सकारात्मक आणि संतुलित ठेवला पाहिजे.
या कार्यक्रमामध्ये सामाजिक जीवन आणि विद्यार्थी जीवन यांची सांगड कशी करता येईल, आदर्श लुप्त झाली आहेत का, स्पर्धात्मक काळात शिक्षणाचा काय उपयोग आहे असल्यास तो कसा, समाज भेद, धर्म भेद, वर्ग भेद अशा भेदाभेदला कसा फाटा देता येईल.असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांनी विचारलेत. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भाषा प्रशाळेचे संचालक डॉ.भूपेंद्र केसुर होते. माजी विद्यार्थी संघाचे सचिव प्रा.विजय लोहार यांनी प्रास्ताविक केले, रा.से.यो.चे कार्यक्रम अधिकारी प्रा.दिलवरसिंग वसावे यांनी आभार प्रकट केले. कार्यक्रमाला डॉ. अखिलेश शर्मा, डॉ.एल.पी.वाघ, प्रा.गोविंद पवार आणि रासेयो चे स्वयंसेवक तसेच एन.सी.सी.चे अनेक छात्र सैनिक उपस्थित होते.