जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांनी रविवारी मुंबईत अंतिम श्वास घेतला. लतादिदींच्या पार्थिवचे अंतिम दर्शन घेण्यासाठी मुंबईत अनेक मान्यवरांनी भेट दिली. दरम्यान, लतादिदींच्या पार्थिवजवळ एलईडी स्क्रीनवर आणि बॅनरवर झळकत असलेले ‘ते’ पोट्रेट जळगावातील कलाकार मितेन लापसिया यांनी साकारलेले होते.
भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे आज मुंबईत निधन झाले. मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात सकाळी ८ वाजून १२ मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या २८ दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. लतादीदींच्या निधनाने संपूर्ण देशातून शोक व्यक्त होत आहे. लतादिदींचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी त्यांच्या घरी प्रभुकुंज येथे ठेवण्यात आले होते. त्यानंतर तेथून अंत्ययात्रा काढत शासकीय इतमामात त्यांच्यावर शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
शिवाजी पार्कवर स्व.लतादिदींच्या पार्थिवजवळ डिजीटल स्क्रीनवर एक पोट्रेट कायम झळकत होते. तसेच त्याठिकाणी देखील पोट्रेट असलेले एक बॅनर लावण्यात आले होते. स्वर्ग रथावरचे ते बॅनर होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अंतिम दर्शन घेताना देखील पोट्रेट शेजारीच दिसत आहे. अनेकांनी आपल्या वॉलपेपर, स्टेटस, पोस्टला तेच पोट्रेट ठेवून श्रद्धांजली अर्पण केली आहे.
जळगावातील कलाकार मितेन लापसिया यांनी लतादिदींचे ‘ते’ पोट्रेट साकारले होते. लतादिदींच्या वाढदिवस अगोदर २२ जुलै २०१६ मध्ये त्यांनी ते ट्विटरद्वारे ट्विट करून लतादिदींच्या ट्विटर हँडलरला टॅग केले होते. लतादिदींना ते स्वतः रिट्विट केले होते. आज लतादिदींना अंतिम श्वास घेतल्यानंतर पुन्हा त्या आठवणींना उजाळा मिळाला आहे. मितेन लापसिया हे सिनेजगतातील डॉन अमिताभ बच्चन यांचे चाहते असून त्यांनी आजवर अनेक सेलेब्रिटींचे पोर्टेट तयार केले आहे. सेलब्रिटींनी देखील त्यांच्या कलेचे कौतुक करून दाद दिली आहे.