पोलीस भरती : १ हजारावर उमेदवार ठरले मैदानी चाचणीत पात्र
जळगाव लाईव्ह न्यूज । ११ नोव्हेंबर २०२१ । जळगाव जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे दि.९ ते ११ नोव्हेंबर या कालावधीत लेखी परीक्षेत पात्र ठरलेल्या गुणवत्ता यादीतील उमेदवारांसाठी कागदपत्र पडताळणीसह शारीरिक व मैदानी चाचणीचे आयोजन करण्यात आले होते. यात १ हजार १४० उमेदवार पात्र ठरले असून ८४ उमेदवार अपात्र ठरले आहेत.
जळगाव जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे पोलीस शिपाई भरतीकरीता नुकतीच लेखी परीक्षा घेण्यात आली होती. या लेखी परीक्षेत पात्र ठरलेल्या गुणवत्ता यादीतील उमेदवारांसाठी दि.९ ते ११ नोव्हेंबरदरम्यान, कागदपत्र पडताळणी तसेच शारीरिक व मैदानी चाचणीचे आयोजन करण्यात आले होते. दि.९ व १० नोव्हेंबर रोजी पुरुष तर दि.११ नोव्हेंबर रोजी महिला व माजी सैनिक पुरुष उमेदवारांना यासाठी बोलविण्यात आले होते. १ हजार ६१७ उमेदवारांना कागदपत्र पडताळणी, शारीरिक व मैदानी चाचणीसाठी बोलविण्यात आले होते मात्र, त्यापैकी १ हजार २२५ उमेदवार शारीरिक व मैदानी चाचणीसाठी हजर राहिले तर ३९२ उमेदवार गैरहजर राहिले. १ हजार १४० उमेदवार मैदानी चाचणीत पात्र ठरले तर ८४ उमेदवार छाती, उंची व कागदपत्र पडताळणीत अपात्र ठरले आहेत.
शारीरीक, मैदानी चाचणीत उमेदवारांना मिळालेल्या गुणांची तात्पुरती यादी जळगाव पोलीस दलाच्या www.jalgaonpolice.gov in संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. शारीरीक मैदानी चाचणीमधील गुणांबाबत उमेदवारांच्या हरकती असल्यास त्यांनी दि.१२ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत पोलीस उपअधीक्षक कार्यालयाकडे समक्ष हजर राहुन लेखी आक्षेप नोंदवावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी केले आहे.