⁠ 
शनिवार, मे 18, 2024

‘भेल’ने मागितली १३ महिन्यांची मुदतवाढ, दीपनगरातील प्रकल्प ६ महिने लांबणीवर पडणार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २० ऑक्टोबर २०२१ । दीपनगरच्या ६६० मेगावॅट सुपर क्रिटिकल प्रकल्पाचे काम दिवसभरातून १८ तास सुरू आहे. कोरोनामुळे ते १० महिने बंद होते. यामुळे प्रकल्पाचे काम घेतलेल्या भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडने १३ महिने मुदतवाढ मागितली असून महानिर्मितीने सहा महिने मुदतवाढ देण्याचे नियोजन केले आहे. परिणामी हा प्रकल्प जून ऐवजी डिसेंबर २०२२ पर्यंत पूर्ण होऊ शकतो.

दीपनगरच्या ६६० मेगावॅट प्रकल्पाचे काम कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत परप्रांतीय कामगार गावाकडे गेल्याने रखडले होते. आता या कामाला गती देण्यात आली आहे. या प्रकल्पाचे काम महानिर्मितीने भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (भेल) या कंपनीला दिले आहे. या कंपनीने कोविड व अन्य कारणे दाखवून प्रकल्पाला १३ महिने मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे. मात्र, महानिर्मितीने या कंपनीला सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याचे नियोजन आहे. त्याबाबतही स्पष्ट निर्देश नाहीत. मात्र, ही मुदतवाढ मिळाल्यास प्रकल्पाला किमान सहा महिने विलंब होईल. तो जून २०२२ ऐवजी डिसेंबर २०२२ मध्ये पूर्ण होईल. आरईसी म्हणजे रुलर इलेक्ट्रिसिटी कमिशनकडून कर्ज स्वरुपात घेतलेला ८० टक्के निधी तसेच राज्य शासनाकडील २० टक्के निधी वेळेवर मिळत असल्याने प्रकल्प उभारणीत अडचणी नाहीत.

या ६६० मेगावॅट प्रकल्पाची चिमणी २६८ मीटर उंच आहे. या चिमणीचे काम पूर्ण झाले असून आता कुलिंग टॉवरचे काम सुरू आहे. अशा प्रकल्पातील विविध सयंत्र उभारणीत चिमणीची उभारणी जोखमीची असते. यात अपघाताची भिती असते. मात्र, सुदैवाने हे काम अपघाताविना पूर्ण झाले. प्रकल्पाच्या कामात सेफ्टी व गुणवत्तेला महत्व दिल्याचे मुख्य अभियंता विवेक रोकडे यांनी सांगितले.