प्राचार्यांच्या घरात डल्ला, पोलिसांनी तिघांना पकडले
जळगाव लाईव्ह न्यूज । ११ डिसेंबर २०२१ । मेहरूण परिसरात बंद घरात चोरट्यांनी डल्ला मारून १२ हजार रूपयांचा ऐवज चोरून नेल्याचा प्रकार उघडकीला आला होता. ही चोरी प्राचार्या कृष्णा मनीष कटुरिया यांच्या घरात झाली होती. याप्रकरणी कटुरिया यांनी पोलिसात गुन्हा दाखल केला होता.अखेर एमआयडीसी पोलिसांनी शुक्रवारी तीन अल्पवयीन चोरट्यांना ताब्यात घेतले आहे. त्यांना बाल न्यायमंडळात हजर केले असता, न्यायालयाने त्यांची रवानगी बाल निरिक्षणगृहात केली आहे.
येथील एडीफाय इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्राचार्या आहेत. पती मनीष यांचे जून २०१९ मध्ये अपघातात निधन झाल्याने तेव्हापासून कृष्णा या अमरावती येथे वास्तव्यास आहेत. तर मुलगा आर्ची हा पुण्यात नोकरीला असल्याने जळगावातील घर तेव्हापासून बंद आहे. हीच संधी साधत चोरट्यांनी बंद घरात डल्ला मारून १२ हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला होता. याप्रकरणी ८ डिसेंबर रोजी कृष्णा कटरिया या अमरावती एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, ही चोरी रेकॉर्डवरील अल्पवयीन चोरट्यांनी केली असल्याची माहिती एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली. त्यानुसार सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, रामकृष्ण पाटील, सचिन मुंडे, किशोर पाटील, मुकेश पाटील, सचिन पाटील यांनी तांबापुरा भागातून दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता, त्यांनी घरफोडी केल्याची कबुली दिली त्यांच्यासोबत आणखी व एक अल्पवयीन साथीदार असल्याची माहिती दिली. त्यानुसार तिसऱ्या अल्पवयीन चोरट्यासही पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर तिघांना बाल न्याय मंडळात पोलिसांनी हजर केले असता न्यायालयाने तिघांची बाल निरिक्षणगृहात रवानगी केली आहे.