जळगाव LCB चे पोलिस अंमलदार सिद्धेश्वर डापकर ‘लोकमत शौर्य पुरस्कारा’ने सन्मानित

जानेवारी 15, 2026 11:15 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । कर्तव्य बजावत असताना स्वतःच्या प्राणांची तमा न बाळगता १२५ फूट खोल विहिरीत उतरून एका महिलेला जीवदान देणारे आणि कुख्यात गुन्हेगाराचा सिनेस्टाईल पाठलाग करून मुसक्या आवळणारे जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB) धडाडीचे पोलिस अंमलदार सिद्धेश्वर डापकर यांचा जळगावमध्ये दिमाखदार सोहळ्यात गौरव करण्यात आला. त्यांच्या या अतुलनीय साहसाबद्दल त्यांना प्रतिष्ठेच्या ‘लोकमत शौर्य पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले आहे.

Siddheshwar Dapkar

जळगाव शहरात आयोजित या विशेष सोहळ्याला नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक (IGP) दत्तात्रय कराळे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते आणि जळगाव जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या उपस्थितीत डापकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी लोकमत समूहाचे विभागीय संपादक, वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि शहरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिरोली शिवारातील तो ‘काळजाचा ठोका चुकवणारा’ क्षण:
सिद्धेश्वर डापकर हे एमआयडीसी (MIDC) पोलिस ठाण्यात कार्यरत असताना त्यांनी माणुसकी आणि धाडसाचे दर्शन घडवले होते. शिरोली शिवारात एका ३५ वर्षीय महिलेने नैराश्यातून १२५ फूट खोल विहिरीत उडी घेतली होती. विहीर अत्यंत जुनी असल्याने तिचे बांधकाम ढासळलेल्या अवस्थेत होते आणि आत उतरणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे होते. मात्र, क्षणाचाही विलंब न लावता डापकर यांनी केवळ दोरखंडाच्या साहाय्याने विहिरीत प्रवेश केला. अंधार आणि निसरड्या भिंतींचे आव्हान पार करत त्यांनी बेशुद्ध अवस्थेतील महिलेला सुखरूप बाहेर काढले आणि तिला नवीन आयुष्य दिले.

कुख्यात गुन्हेगार भोला सिंगचा थरारक पाठलाग:
दुसऱ्या एका घटनेत, न्यायालयाच्या तावडीतून पळून गेलेला (Absconder) आणि पोलिसांसाठी डोकेदुखी ठरलेला कुख्यात गुन्हेगार ‘भोला सिंग बावरी’ याच्या मागावर डापकर होते. सलग २४ तास पाळत ठेवून आणि तांत्रिक तपासाची सांगड घालत त्यांनी पहाटे ३:०० वाजता त्याला गाठले. पोलिसांची चाहूल लागताच गुन्हेगाराने पळ काढला, मात्र डापकर यांनी भररस्त्यात त्याचा थरारक पाठलाग केला. गुन्हेगार हिंसक होण्याची शक्यता असतानाही, त्यांनी त्याला ‘बॉडी लॉक’ (Body Lock) लावून जेरबंद केले. तसेच एमआयडीसी पोलीस स्टेशनला कार्यरत असताना अनेक मर्डर चे गुन्हे, चोरीचे गुणे मोठ्या कसोशीने आणि जिद्दीने तपास करून सदर पुण्याचा छडा लावला आहे

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now