जळगाव लाईव्ह न्यूज । २ ऑक्टोबर २०२१ । जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि आगामी सण, उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली आज जिल्हाभरात सायंकाळी ४ तास मेगा कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. पोलिसांच्या कारवाईत अनेक फरार, तडीपार आणि पाहिजे असलेले आरोपी मिळून आले असून काही ठिकाणी शस्त्रे देखील सापडल्याचे समजते.
जिल्ह्यात गेल्या महिनाभरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून गोळीबार आणि अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला आहे. नुकतेच नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर हे जिल्ह्यात येऊन गेले असून गुन्हेगारांची खैर नाही असा इशारा त्यांनी दिला होता. गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी सायंकाळी सहा ते दहा वाजता जिल्ह्यात मेगा कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. कोम्बिंगमध्ये अनेक फरार, तडीपार आणि पाहिजे असलेले गुन्हेगार मिळून आले आहेत.
पोलिसांनी कोम्बिंगमध्ये अवैध धंदे, अवैध दारू विक्रेत्यांवर देखील कारवाई केली आहे. जिल्ह्यात या प्रकारच्या कारवाया सुरूच राहणार असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी ‘जळगाव लाईव्ह’शी बोलताना सांगितले.