२० लाखाच्या बायो डिझेलसह तिघांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
जळगाव लाईव्ह न्यूज । २८ ऑक्टोबर २०२१ । बायो डिझेलचा अवैधरित्या साठा करून विक्री करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. तिघांकडून २० लाख रुपयांच्या बायोडिझेलसह ३१ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. भुसावळ-मुक्ताईनगर फोरवे हायवे लगत असलेल्या गरीब नवाज ढाब्याजवळ ही कारवाई करण्यात आली.
भुसावळ-मुक्ताईनगर फोरवे हायवे लगत असलेल्या गरीब नवाज ढाब्याजवळ काही लोक अवैधरित्या बायो डिझेलची साठवणूक व काळाबाजार करून विक्री करीत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवार दि.२७ रोजी वरणगाव पोलीस ठाणे गाठून याबाबतची सर्व माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ यांना दिली. त्यांनतर स्थानिक गुन्हे शाखा व वरणगाव पोलिसांच्या पथकाने संयुक्तरित्या सापळा रचून युसूफ खान नूर खान (वय-५४, रा.सिद्धेश्वर नगर, वरणगाव), आफताब अब्दुल कादर राजकोटिया (वय-२१, रा.हिनापार्क, वरणगाव, मुळ रा.हुसेनी चौक, ४२० टकिया स्टेट कालावड, जि.जामनगर, गुजरात) व बेचु मौर्या चंद्रधन मौर्या (वय-४१, रा.खरगपूर, पोस्ट मेहनगर, आजमगड, उत्तरप्रदेश) अशा तिघांना ताब्यात घेतले.
साठा करून करत होते विक्री
संशयितांनी जमिनीत पुरून ठेवलेल्या २ टँकरच्या टाक्या व टँकर (क्र. डी.एन.०९, जे.९६६३) मध्ये बायो डिझेलचा साठा करून ठेवला होता. त्यातून पाइपलाइन तयार करून एक डिस्पेन्सर मशीन, नोझल व त्यावर मीटर असलेल्या मशिनद्वारे या बायो डिझेलची विक्री केली जात होती. पोलिसांनी संशयितांकडून २० लाख ७५ हजार रुपये किमतीचे बायो डिझेल, १० लाख रुपये किमतीचे टँकर व १ लाख २० हजार रुपये किमतीचे डिस्पेन्सर, नोझल मशीन व पाईप असा ३१ लाख ९५ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
यांनी केली कारवाई
स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले, सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे, सहाय्यक फौजदार युनूस शेख इब्राहिम, पोहेकॉ. सुनील दामोदरे, दीपक पाटील, पोना. रणजित जाधव, किशोर राठोड, पोकॉ. श्रीकृष्ण देशमुख, चालक पोना. दर्शन ढाकणे, पोहेकॉ. भारत पाटील, वरणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ, सहाय्यक फौजदार नरसिंग चव्हाण, सहाय्यक फौजदार इस्माईल शेख इब्राहिम आदींच्या पथकाने ही कारवाई केली.