स्टंट करणाऱ्यांविरोधात पोलीस आक्रमक : ५ जणांवर गुन्हे दाखल

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ एप्रिल २०२३ । मेहरूण तलाव ट्रॅक परिसरामध्ये रविवारी सकाळी टवाळखोर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना बाईकवर स्टंटबाजी करणे चांगलेच महागात पडले आहे. कारण स्टंटबाजी करणाऱ्या अल्पवयीन पाच विद्यार्थ्यांना एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याविरूध्द एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी कि, मेहरूण ट्रॅक परिसरामध्ये सकाळी-सकाळी काही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून सुसाट वाहने चालवून स्टंटबाजी केली जात असल्याची तक्रार एमआयडीसी पोलिसांना प्राप्त झाली होती. रविवारी ९ एप्रिल रोजी सकाळी  हा प्रकार खुद्द जिल्हा पोलिस अधीक्षक एम.राजकुमार यांनी पाहिल्यानंतर त्यांनी तत्काळ एमआयडीसी पोलिसांना कारवाईच्या सूचना केल्या. सकाळी ७ वाजता एमआयडीसी पोलिस निरीक्षक जयपाल हिरे, गणेश शिरसाळे, किशोर पाटील, योगेश बारी, समाधान टहाकळे, राकेश बच्छाव यांनी मेहरूण ट्रॅक गाठून स्टंटबाज विद्यार्थ्यांचा शोध सुरू केला. सीसीटीव्ही तपासून त्या पाच विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांच्याविरूध्द एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास गणेश शिरसाळे हे करीत आहेत. दरम्यान, पालकांनी आपल्या अल्पवयीन मुलांना वाहने देवू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आलेले आहे.