⁠ 
शनिवार, डिसेंबर 14, 2024
Home | जळगाव जिल्हा | रस्त्याच्या कामासाठी प्रहारने भरपावसात खड्ड्यात मांडला ठिय्या!

रस्त्याच्या कामासाठी प्रहारने भरपावसात खड्ड्यात मांडला ठिय्या!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ जुलै २०२४ । रावेर तालुक्यातील अनेक रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून पावसाळा सुरु झाल्याने मोठमोठे खड्डे पडले आहेत. रस्त्याच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी यांच्या नेतृत्वाखाली पिंप्री-मंगरूळ रस्त्यावर भर पावसात आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी खड्ड्यात बसून आपल्या मागण्या मांडल्या. आंदोलनाची दखल घेत अधिकाऱ्यांना यावे लागले.

रावेर तालुक्यात गेल्या अनेक वर्षापासून रस्त्यांची पुरेशी कामेच झालेली नाही. बहुतांश रस्त्यावर केवळ डागडुजी केली जात असल्याने पावसाळ्यात परिस्थिती जैसे थे होत असते. पिंप्री मंगरूळ रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून १-१ फुटाचे खड्डे पडले आहेत. रस्त्याने ये-जा करताना नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. विशेषतः विद्यार्थी, महिला आणि शेतकरी वर्गाचे मोठे हाल होत आहे. वारंवार तक्रार करून देखील समस्या सुटत नसल्याने नागरिकांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी यांना सांगितले होते.

भर पावसात खड्ड्यात केले आंदोलन
बुधवारी दुपारी भर पावसात प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी यांनी नागरिकांनासोबत घेत थेट पिंप्री मंगरूळ रस्ता गाठला. पाऊस सुरू असताना देखील खड्ड्यात बसून त्यांनी आंदोलन पुकारले. काही आंदोलकांनी तर चिखलाच्या पाण्यात झोपा काढल्या. अधिकारी येणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतल्याने पावसात देखील आंदोलन चांगलेच पेटले.

अधिकाऱ्यांनाही घ्यावी लागली दखल
आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने अधिकारी त्याठिकाणी पोहचले. जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना देखील अनिल चौधरी यांनी जनतेचे हाल जाणून घेण्यासाठी पाण्यात बसवले. अधिकाऱ्यांनी वरिष्ठांशी बोलणे करून दिले असता लवकरात लवकर रस्त्याचे काम सुरु करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. रस्त्याचे काम मार्गी लागल्यास केऱ्हाळा, अहिरवाडी, खानापूर, पिंप्री, मंगरूळ गावातील नागरिकांना फायदा होणार आहे.

आंदोलनात यांचा होता सहभाग
पिंप्री-मंगरूळ रस्त्याच्या आंदोलनात प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी यांच्या नेतृत्वाखाली रावेर प्रहार तालुकाध्यक्ष भरत लिधुरे, उपसरपंच राकेश भंगाळे, संतोष बारी, रावेर युवक तालुकाध्यक्ष योगेश निकम, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष वासिम शेख सचिन महाजन, योगेश पाटील, कृष्णा महाजन, राहुल महाजन, माजी उपसरपंच विकास पाटील आदींसह परिसरातील शेतकरी बांधव आणि नागरिकांनी सहभाग घेतला होता.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.