जळगाव लाईव्ह न्यूज । ९ ऑगस्ट २०२१ । इन्स्टाग्रामवरून संपर्क करून सिद्धेश कृष्णा महाजन (वय १६, रा. जोशी पेठ) या मुलाला कोल्हे हिल्स येथे फोटो काढण्यासाठी बोलावून तिघांनी त्याला मारहाण करून सव्वा लाख रुपये किमतीचा कॅमेरा घेऊन पलायन केल्याची घटना रविवारी सकाळी १० वाजता घडली. या तिघांनी काळ्या रंगाचे कपडे परिधान केले असून, तोंडाला मास्क लावलेला होता. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिद्धेश याचा फोटोग्राफीचा व्यवसाय असून, सोशल मीडियावर तो सक्रिय असतो. शनिवारी सायंकाळी एका तरुणाने इन्स्टाग्रामवरून संपर्क साधला.आम्हाला फोटो काढायचे आहेत, त्यासाठी तू रविवारी सकाळी १० वाजता कोल्हे हिल्सला येऊ शकतो का? तुझे जे काही पैसे होतील ते आम्ही देऊ, असे सांगून या तिघांनी सांगितले. त्यानुसार सिद्धेश हा कोल्हे हिल्स येथे गेला.या तिघांनी दुचाकी रस्त्याच्या कडेला लावून वर चालत गेले. तेथे कोणी नसल्याचे पाहून सिद्धेश याला मारहाण करून कॅमेरा व मोबाईल हिसकावून पळ काढला.
थोड्या अंतरावर गेल्यावर मोबाईल परत केला व ते निघून गेले. हा प्रकार सिद्धेश याने मित्र व घरी सांगितला. त्यानुसार त्याने तालुका पोलीस ठाणे गाठून माहिती दिली.पोलिसांनी सिद्धेशला सोबत घेऊन कोल्हे हिल्स परिसरात पाहणी केली. त्यानंतर दुपारी गुन्हा दाखल करण्यातआला.