⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

एकनाथ खडसे व संजय राऊतांच्या फोन टॅपिंग प्रकरणात धक्कादायक माहिती समोर

जळगाव लाईव्ह न्यूज । २० एप्रिल २०२२ । नोव्हेंबर 2019 मध्ये महाविकास आघाडी सरकार स्थापन होण्यापूर्वी अनेक बड्या नेत्यांचे फोन टॅपिंग हा राज्याच्या राजकारणात मोठा मुद्दा बनला आहे. आता या फोन टॅपिंग प्रकरणात एक नवीन धक्कादायक माहिती समोर आली आहे.

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचा ६७ दिवस तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचा तब्बल ६० दिवस फोन टॅप करण्यात आला होता. त्याननंतर आता या नेत्यांचे फोन समाजविघातक घटक नावाखाली टॅप करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय आहे.

पोलीस तपासादरम्यान सापडलेल्या राज्य गुप्तचर विभागाच्या (एसआयडी) पत्रातून ही बाब समोर आली आहे. दोन नेत्यांचे फोन टॅप करण्यासाठी एसआयडीने एसीएस होमला दिलेल्या अर्जात राऊत आणि खडसे यांच्याऐवजी दुसरे नाव वापरले होते आणि त्यांना समाजविघातक घटक म्हणून संबोधले होते.

या कारणास्तव तत्कालीन एसीएस होमने फोन टॅपिंगला परवानगी दिली होती, त्यानंतर खडसे यांचा फोन 67 दिवस आणि राऊत यांचा फोन 60 दिवस टॅप करण्यात आला होता.

दरम्यान, राज्याच्या माजी एसआयडी प्रमुख रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध मुंबईतील कुलाबा पोलिस ठाण्यात बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणी यापूर्वीच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणानुसार, रश्मी शुक्ला या एसआयडीच्या प्रमुख असताना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचा फोन बेकायदेशीरपणे टॅप करण्यात आला होता.

दरम्यान, या प्रकरणावर बोलताना संजय राऊत यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. राऊत म्हणाले की, “नाना पटोले (Nana Patole), एकनाथ खडसे, माझ्यासहित सर्वांना समाजविघातक घटक असल्याचं खोटं सांगत फोन टॅप करण्यात आले होते हे समोर आलं आहे. गृहविभागाकडून फोन टॅपिंगची परवानगी घेताना रश्मी शुक्ला यांनी ड्रग्ज तस्कर, गँगस्टर असल्याचं सांगितलं. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार तयार होत असताना आमच्यावर नजर ठेवत नव्या सरकारसंबंधी माहिती घेतली जात होती. आमच्या अभिव्यक्तीवर घाला घालण्यात आला. एक पोलीस अधिकारी ज्यांच्याकडून तुम्ही निष्पक्ष काम करण्याची अपेक्षा ठेवता त्या एका राजकीय पक्ष, नेत्यासंबंधी आपली निष्ठा सिद्ध करण्यासाठी हे सर्व करत होती. आता रश्मी शुक्ला यांना केंद्र सरकार संरक्षण देत आहे. हे दुर्भाग्यपूर्ण आहे “