⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

दोन दिवसाच्या दरवाढीनंतर आज पेट्रोलियम कंपन्यांनी घेतला ‘हा’ निर्णय

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ मार्च २०२२ । सलग दोन दिवस पेट्रोल-डिझेलच्या (Petrol Diesel Rate) दरात वाढ केल्यानंतर आज गुरुवारी दिलासा मिळाला आहे. आज सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल दर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आज जळगावात (Jalgaon) पेट्रोलचा प्रति लिटरचा दर जवळपास ११२.९७ रुपये इतका आहे. तर डिझेलचा प्रति लिटरचा दर ९५.६९ रुपये इतका आहे.

१३७ दिवसांनंतर मंगळवारी सकाळी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली होती. त्यादिवशी पेट्रोल प्रतिलीटर 84 पैसे तर डिझेलच्या दरात प्रतिलीटर 83 पैशांनी वाढ करण्यात आली आहे. त्यांनतर आदल्या दिवशीही पेट्रोल आणि डिझेलचे दर 80 पैशांनी वाढले होते.

सरकारी तेल कंपन्यांचे म्हणणे आहे की, जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने वाढ होत असल्याने त्यांच्यावर मोठा बोजा पडला आहे. त्याची भरपाई करण्यासाठी किरकोळ दरात वाढ करणे गरजेचे झाले आहे. त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे.

सरकारी तेल कंपन्यांनी जारी केलेल्या दरांनुसार, राष्ट्रीय राजधानी दिल्लीत आज पेट्रोलची किंमत 97.01 रुपये आहे, तर एक लिटर डिझेल 88.27 रुपयांना विकले जात आहे. याशिवाय मुंबईत पेट्रोलचा दर 111.67 रुपये आहे. त्याच वेळी, डिझेलचा दर 95.85 रुपये प्रति लिटरवर कायम आहे.

इतर महानगरांबद्दल बोलायचे झाले तर कोलकात्यात पेट्रोलचा दर 106.34 रुपये आणि डिझेलचा दर 91.42 रुपये प्रति लिटर आहे. याशिवाय चेन्नईतही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. आज येथे पेट्रोल 102.91 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 92.95 रुपये दराने विकले जात आहे.

तेलाच्या किमती दररोज अपडेट केल्या जातात
आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीच्या आधारे पेट्रोल आणि डिझेलची किंमत दररोज अपडेट केली जाते. तेल विपणन कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींचा आढावा घेऊन दर निश्चित करतात. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम तेल कंपन्या दररोज सकाळी वेगवेगळ्या शहरांच्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीची माहिती अपडेट करतात. मात्र, नोव्हेंबरपासून भारतातील किमती स्थिर आहेत.