⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

पेट्रोल-डिझेल दरांबाबत पेट्रोलियम कंपन्यांनी घेतला ‘हा’ निर्णय

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ ऑगस्ट २०२१ । जागतिक कमॉडिटी बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झाली आहे. मात्र पेट्रोलियम कंपन्यांनी तूर्त इंधन दर स्थिर ठेवण्याला प्राधान्य दिले आहे. आज मंगळवारी सलग १७ व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचा भाव स्थिर आहे.जळगावात आजचा एक लीटर पेट्रोलचा भाव १०८.९८ रुपये आहे तर डिझेलचा भाव ९७.०८ रुपये इतका झाला आहे.

एका बाजूला पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर ठेवून मोदी सरकारने काहीसा दिलासा दिला असला तरी इंधनावरील करात कोणत्याही परिस्थितीत कपात होणार नाही, असा अप्रत्यक्ष संदेशच केंद्राने दिल्याची चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे सामान्य लोकांच्या अपेक्षा फोल ठरण्याची शक्यता आहे. पेट्रोल-डिझेलवर लादण्यात आलेल्या कराच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारच्या तिजोरीत चांगलाच महसूल जमा होत आहे.

मागील दोन महिन्यात कंपन्यांनी दरवाढीचा सपाटा लावला होता. त्यामुळे अनेक शहरात पेट्रोलने १०० रुपयांची पातळी ओलांडली. डिझेल शंभरीच्या नजीक पोहोचले आहे. या दरवाढीने सरकार विरोधात संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे कंपन्यांनी तूर्त इंधन दर जैसे थेच ठेवले आहेत.

जळगाव शहरात गेल्या ६ महिन्यापूर्वी २५ जानेवारी २०२१ रोजी पेट्रोलचे दर ९३.४७ रूपये तर डिझेल ८२.५६ प्रति लिटर मिळत होते. त्यात जुलै २०२१ मध्ये प्रचंड वाढ झाली असून ६ महिन्यात पेट्रोलचे दर १५ रूपये ५१ पैशांनी तर डिझेलचे १४ रूपये ५२ पैसे प्रति लिटर वाढले आहेत.