जळगाव लाईव्ह न्यूज । २० जून २०२३ । घरात पेस्ट कंट्रोल केल्याने घरातील लोक घर बंद करून चुलतभावाकडे गेले. याची संधी मिळताच साडेचार लाखांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला असल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
अक्षय सुनील गंगेले (घाटे पेट्रोलपंपासमोर, नारायणवाडी, चाळीसगाव) यांचा फोटोग्राफरचा व्यवसाय आहे. त्यांनी शुक्रवार, 16 रोजी त्यांच्या घरात झुरळ, किडे मारण्याचे औषधाची फवारणी केल्याने कुटुंब घराला कुलूप लावून शहरातच मालेगावरोड भागात राहणार्या चुलत भावाकडे गेले. रविवार, १८ रोजी रात्री आठ वाजता नळाला पाणी आल्याने गंगेले यांचे वडिल घरी आले. पाणी भरून पुन्हा ते घर बंद करून चुलत भावाकडे आले.
दुसर्या दिवशी सोमवार १९रोजी सकाळी गंगेले कुटुंबीय आपल्या घरी आले असता त्यांना घराचा मुख्य दरवाजा उघडा दिसला व कुलूप आणि सेंट्रल लॉक तुटलेले दिसले. घरातील सर्व कपडे व सामान अस्ताव्यस्त पडलेले होते. घराच्या वरील मजल्यावरील बेडरूमध्ये जावून पाहीले असता बेडरूममधील लोखंडी कपाटाचे लॉक तुटलेले व त्यातील कपडे बाहेर फेकलेले दिसले तसेच कपाटातील सोन्या चांदीचे दागिणे, रोकड रक्कम दिसून आली नाही.
चोरट्यांनी घराचा दरवाजा तोडून कपाटातील एक लाख 20 हजार रुपये किंमतीचे तीन तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, 32 हजार रुपये किंमतीचे आठ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी मंगळसूत्र, 12 हजार रुपये किंमतीचे तीन ग्रॅम वजनाची सोन्याची नथ, 28 हजार रुपये किंमतीचे एक ग्रॅम वजनाचे सोन्याचे सात तुकडे, दोन लाख 16 हजार रुपये किंमतीचे प्रत्येकी सहा ग्रॅम वजनाच्या 9 सोन्याच्या अंगठ्या, 900 रुपये किंमतीचे चांदीचे शिक्के, दिड हजार रुपये किंमतीचे चांदीचे पाच भार वजनाचे ब्रेसलेट, दिड हजार रुपये किंमतीचे चांदीचे 10 जोडवे, 600 रुपये किंमतीचे चांदीचे दिवे व 36 हजार रुपयांची रोकड असा सुमारे चार लाख 48 हजार 500 रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेला.