⁠ 
शनिवार, मे 4, 2024

मनपातील लोकप्रतिनिधी म्हणतात, आयुक्तांचा नाही अधिकाऱ्यांवर वचक

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ नोव्हेंबर २०२२ । जळगाव शहर महानगरपालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त डॉ.विद्या गायकवाड या सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत. जळगाव शहरात गेल्या चार महिन्यापासून विकास होत नाहीये. अशातच अधिकारी लोकप्रतिनिधींच ऐकत नाहीत अशा प्रकारच्या कित्येक तक्रारी लोकप्रतिनिधी करत आहेत. याचबरोबर नुकत्याच झालेल्या महासभेतही हा विषय चांगलाच गाजला. यामुळे नक्की जळगाव शहरातील लोकप्रतिनिधींना आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्या कारभाराबद्दल काय वाटतं? त्यांचा अनुभव काय आहे? यासाठी ‘जळगाव लाईव्ह’च्या माध्यमातून जळगाव शहरातील लोकप्रतिनिधींची संवाद साधण्यात आला.

मनपा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी त्यांच्या कार्यपद्धतीमध्ये बदल करण्याची गरज आहे. त्यांचा अधिकाऱ्यांवर वचक नाही ही वस्तुस्थिती आहे. अधिकारी वर्ग काम करत नाही आणि तर दुसरीकडे बोट आयुक्तांकडे दाखवतात. यामुळे त्यांनी कार्यपद्धतीमध्ये बदल करण्याची खूप आवश्यकता आहे. याचबरोबर शासन दरबारी जो पाठपुरावा करावा लागतो त्यातही त्या कमी पडत आहेत. हे सगळे जरी असले तरी देखील जळगाव शहराचा विकास व्हावा यासाठी त्या नेहमी तत्पर असतात आणि नेहमीच सहकार्य करतात
जयश्री महाजन, महापौर, जळगाव शहर महानगरपालिका

जळगाव शहर महानगरपालिकेच्या प्रथम महिला आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी आतापर्यंत शासन दरबारी कित्येक चांगले प्रस्ताव पाठवले. त्यांच्या परीने ते नेहमीच चांगलं काम करायचा प्रयत्न करतात. मात्र शासन दरबारी वेळोवेळी व्यवस्थित प्रस्ताव पाठवूनही काम होत नाही. कारण की आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांचा अधिकाऱ्यांवर वचक नाही. याचबरोबर सध्या सुरू असलेल्या पक्षांतर्गत राजकारणाला देखील त्यांना सामोरे जावे लागत आहे.
कुलभूषण पाटील, उपमहापौर, जळगाव मनपा

जळगाव शहर महानगरपालिकेमध्ये विद्या गायकवाड या चांगलं काम करायचा प्रयत्न करत आहेत. मात्र पक्षांतर्गत कलहामुळे आणि राजकारणामुळे डॉ. विद्या गायकवाड यांना काम करता येत नाहीये. पर्यायी शहराचा विकास होत नाही.
चेतन संकत, नगरसेवक, जळगाव शहर महानगरपालिका.

आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांची कार्यपद्धत अतिशय योग्य आहे. त्यांच्याकडे कोणतेही काम घेऊन गेलो, कोणत्याही कामाला त्यांची गरज लागली तर त्या नेहमीच सहकार्य करतात. मात्र कारण नसताना त्यांना टार्गेट केलं जात आहे. मनपा आयुक्त या काही शहरासाठी निधी आणू शकत नाहीत याचा पाठपुरावा हा लोकप्रतिनिधींनाच करायचा आहे. मात्र तो केला जात नाही आणि खापर मनपा आयुक्त यांच्यावर फोडलं जात आहे. त्या दुसरीकडे 58 कोटीचा प्रस्तावही अजून अंतर्गत कलहामुळे महासभेच्या पटलावर ठेवण्यात आला नाहीये. यामुळे एका कार्यक्षम आयुक्तांवर लोकप्रतिनिधी कारण नसताना आरोप करत आहेत.
प्रशांत नाईक, नगरसेवक, जळगाव मनपा

जळगाव शहर महानगरपालिकेच्या आयुक्त डॉक्टर विद्या गायकवाड यांच्या कार्यपद्धतीबद्दल महासभेत पहिल्यांदा आवाज उठवणारी मीच होते. त्यांनी कित्येक मोठमोठ्या योजनांचे काम गांभीर्याने न घेतल्यामुळे त्या योजना पूर्ण होऊ शकल्या नाहीत. याचबरोबर त्यांनी महासभेमध्ये देखील एक चुकीचा ठराव ठेवला होता. डी मार्ट समोरचा रस्ता जो आपल्या अत्यारितच नाही अशा रस्त्याचा ठराव विद्या गायकवाड यांनी आणला होता. त्यावेळी त्यांना मी विरोध केला होता. यामुळे त्यांची कार्यपद्धती बरोबर नाही.
ऍड. शुचिता हाडा, नगरसेविका, जळगाव मनपा

आयुक्त विद्या गायकवाड यांनी स्वतः खाली काम करत असणाऱ्या अधिकाऱ्यांवर वचक ठेवायला हवा. जो ते ठेवू शकत नाहीत. इतर गोष्टीत विद्या गायकवाड सर्वांनाच सहकार्य करतात. विकास कामांमध्ये कधीच अडथळा आणत नाहीत. मात्र त्यांनी आपल्या खाली काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर वचत ठेवायला हवा.
रियाझ बागवान, नगरसेवक, जळगाव मनपा