जळगाव लाईव्ह न्यूज । ६ ऑगस्ट २०२२ । गेल्या ३ वर्षांपासून शिवाजीनगर उड्डाणपूल सुरु व्हावा यासाठी नागरिक देव पाण्यात ठेऊन बसले आहेत. तो शिवाजी नगरचा पूल सामाजिकी कार्यकर्ते दीपक गुप्ता व इतर नागरिकांनी शनिवारी सकाळी सुरु केला. मात्र ३ तासात शिवाजीनगरच्या नागरिकांनी काम अपूर्ण आहे असे सांगत पूल पुन्हा बंद केला. शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाचे अंतिम टप्प्यातील काम अपूर्ण असल्याने पूल सुरु होण्यासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.
जळगाव शहरातील शिवाजीनगर परिसर आणि यावल, चोपडा मार्गावरील हजारो नागरिकांच्या रोजच्या येण्याजाण्याचा मुख्य मार्ग असलेल्या शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाचे काम तीन वर्षापासून सुरु आहे. कोरोना आणि काही तांत्रिक अडचणीमुळे पुलाच्या कामाला विलंब झाला असला तरी सध्या काम अंतीम टप्प्यात आले आहे. पुलावर डांबरीकरणाचा पहिला टप्पा देखील पूर्ण झाला असून दुसरा थर अंथरणे अद्याप बाकी आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पूल सुरु होणार असल्याची माहिती मक्तेदाराच्या प्रतिनिधीने दिली होती.
पूल सुरु होत नसल्याने दोन दिवसांपूर्वी माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक गुप्ता यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची भेट घेत पूल सुरु करण्याची मागणी केली होती. दरम्यान, शनिवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास दीपक गुप्ता यांच्यासह काही नागरिकांनी थेट पूल गाठत पुलाचे उदघाटन केले. काही मिनिटात पुलावरून वाहतूक देखील सुरु झाली. तत्पूर्वी गेल्या आठवड्यात देखील नगरसेवक दिलीप पोकळे आणि काही नागरिकांनी पुलाचे उदघाटन करण्याचे सांगितले होते मात्र ऐनवेळी ते रद्द करण्यात आले.
पूल सुरु करण्यावरून सध्या शिवाजीनगरात दोन-तीन गट पाहायला मिळत आहे. पूल तात्काळ सुरु करावा असे एका गटाचे म्हणणे आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम झाल्याशिवाय पूल सुरु करू नये अशी दुसऱ्या गटाची मागणी आहे. शनिवारी पुलाचे उदघाटन झाल्यानंतर तीन तासांनी शिवाजी नगरातीलच नागरिकांनी पुन्हा पुलावर धाव घेत पूल बंद केला. जळगावकरांना तीन तासांसाठी मिळालेली सूट लागलीच संपली असून संपूर्ण काम पूर्ण करून दोन दिवसात पूल सुरु होण्याची शक्यता आहे.