जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ मार्च २०२२ । येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील विज देयके प्रलंबित असल्याची माहिती महावितरणकडून जाहीर करण्यात आली होती. परिणामी ३१ मार्च २०२२ रोजी दोन टप्प्यात ३४ लाख २३ हजार रुपयांचे वीज देयक महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना अदा करण्यात आले आहेत.
कोरोना महामारीच्या काळामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय हे कोविड रुग्णालय म्हणून घोषित झाले होते. त्यावेळेला काही वीज देयक थकीत राहिल्याची माहिती महावितरण कंपनीने जाहीर केली होती. वीज देयके अदा करण्याविषयी अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद आणि प्रशासकीय अधिकारी डॉ. जितेंद्र सुरवाडे यांनी वरिष्ठ कार्यालयाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू केला होता.
या पाठपुरावाचा परिपाक म्हणून दोन टप्प्यांमध्ये वीज देयके देण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव यांना निधी प्राप्त झाला होता. त्यानुसार पहिल्या टप्प्यामध्ये महावितरण कंपनीला २५ लाख ६७ हजार रुपयांचा धनादेश अदा करण्यात आला होता. गुरुवारी ३१ मार्च रोजी ८ लाख ५६ हजार रुपयांचा धनादेश दुसऱ्या टप्प्यामध्ये महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना अदा करण्यात आला.
कंपनीचे अधिकारी उपव्यवस्थापक रवी चिडे, सहाय्यक लेखापाल निलेश मुळे यांना अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद यांनी धनादेश सुपूर्द केला. यावेळी प्रशासकीय अधिकारी डॉ.जितेंद्र सुरवाडे उपस्थित होते. यामुळे आता ३४ लाख २३ हजार रुपयांचा धनादेश महावितरण कंपनीला देण्यात आलेला आहे.