सावधान ! उत्तर महाराष्ट्रात आणि विदर्भात म्युकोरमायकोसिसचे रुग्ण आढळले
जळगाव लाईव्ह न्यूज । ०७ मे २०२१ । भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने प्रचंड कहर निर्माण केलेला असतानाच आता कोरोना बाधितांमध्ये म्युकर मायकोसिसचा संसर्ग पाहायला मिळत आहे. कोरोनाशी लढताना रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे घरी परतणाऱ्या अनेक रुग्णांना आता म्युकोरमायकोसिसची लागण होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. म्युकोरमायकोसिसचा हा आजार इतका गंभीर आहे की, रुग्णाच्या जगण्याची शक्यता केवळ 50 टक्के इतकी असते. तसेच यामुळे अंधत्त्व आणि इतर गंभीर व्याधी उद्धवू शकतात.
सध्या उत्तर महाराष्ट्रात आणि विदर्भात म्युकोरमायकोसिसचे अनेक रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे म्युकोरमायकोसिसचा वाढता संसर्ग राज्यासाठी नव्या संकटाची चाहुल मानली जात आहे.
दरम्यान, रुग्णांची झपाट्याने वाढणारी संख्या पाहता म्युकोरमायकोसिस साथीच्या आजाराप्रमाणेही फैलावू शकतो, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. रुग्णांची संख्या वाढत असल्याने आतापासूनच दोन्ही जिल्ह्यांमध्ये म्युकोरमायकोसिसच्या औषधांचा तुटवडा जाणवू लागला आहे. ही औषधेही प्रचंड महाग आहेत.
सध्याच्या घडीला मुंबईच्या परळ येथे म्युकोरमायकोसिसवर उपचार होणारे एकमेव स्पेशालिटी रुग्णालय आहे. या रुग्णालयात म्युकोरमायकोसिसच्या 31 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. यापैकी 25 जण हे मुंबईबाहेरील आहेत. याचा अर्थ राज्यात म्युकोरमायकोसिसचा संसर्ग वेगाने वाढत आहे.
म्युकोरमायकोसिसच्या संसर्गाला साधारण नाकापासून सुरुवात होते. त्यानंतर हा संसर्ग तोंडाचा जबडा आणि मेंदूपर्यंत पसरत जातो. हा संसर्ग मेंदूपर्यंत पोहोचल्यानंतर डॉक्टरांच्या हातात उपचार करण्यासारखे फार काही उरत नाही, असे डॉ. हेतल मारफातिया यांनी म्हटले.