शिवखोरा येथे पंचकुण्डात्मक गौसुरभी विष्णू महायज्ञ
जळगाव लाईव्ह न्यूज । १५ नोव्हेंबर २०२१ । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ परिसरातील शिवखोरा भागात अखिल भारतीय श्री पंचतेरह भाई त्यागी यांच्यावतीने पंचकुण्डात्मक गौसुरभी विष्णु महायज्ञ सुरु आहे. १ ऑक्टोबरपासून सुरू असलेल्या या धार्मिक कार्यक्रमात संत महात्मा व साधू यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती आहे.
शाहू नगरातील तपस्वी हनुमान मंदिर येथील सरजुदास महाराज यांचे शिष्य बालकदास महाराज ( घोडेवाले ) यांनी हे महायज्ञ आयोजित केले आहे. श्री पंचकुण्डात्मक गौसुरभी विष्णू महायज्ञात सहभागी नागरिकांकडून विश्व शांती, पर्यावरणाची सुरक्षा, कोरोना महामारीपासून बचाव यासाठी प्रार्थना केली जात आहे. दररोज सकाळी ७ ते १२ वाजेपर्यंत त्यानंतर दुपारी ३ ते सायंकाळी ६ दरम्यान अखंड होम हवन सुरु असतो.
१७ रोजी सकाळी तपस्वी हनुमान मंदीरात ५६ भोग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी १२ वाजेपासून हत्ती, घोडे पालखीसह नागा साधू यांच्या शाही मिरवणुकीस प्रारंभ होणार आहे. ही मिरवणूक शहरातील विविध भागातून काढण्यात येणार असून शिवखोरा येथील गोवर्धन गोशाळा येथे समारोप होणार आहे. या मिरवणुकीत डिगंबर आखाडा, जुना गड, शाही यात्रा, गिरीभारती, पुरी, नागा या पाच आखाड्यातील साधूसंत उपस्थित राहणार आहेत. १९ रोजी या महायज्ञाचा समारोप होणार असल्याचे बालकदास महाराज यांनी सांगितले..