जळगाव लाईव्ह न्यूज । २३ एप्रिल २०२५ । तुम्हीही उन्हाळी कापूस लागवड करण्यासाठी बियाणे खरेदीला जात असाल तर सावधान. चोपडा तालुक्यातील चुंचाळे येथे पत्र्याच्या शेडमध्ये दडवलेला १८ लाख रुपये किंमतीचा कापसाचा बोगस बियाण्यांचा साठा कृषी विभागाने जप्त केला आहे. या साठ्यात बोगस एचटीबीटी कापूस बियाण्यांची १२७३ पाकिटे कृषी विभागाने जप्त केली आहेत. नितीन नंदलाल चौधरी (वय -३८) याच्याविरुद्ध विविध कलमांद्वारे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

याबाबत असे की, चुंचाळे (ता. चोपडा) या गावी नितीन नंदलाल चौधरी यांने चुंचाळे अकुलखेडा रोडवरील पत्र्याच्या शेडमध्ये तब्बल हजारो पाकीट कापसाचे बोगस बियाणे विक्रीसाठी आणले होते. याबाबतची गुफ्त माहिती मिळाल्यावर जिल्हा कृषी विभागाच्या भरारी पथकाने धाड टाकली. यावेळी तब्बल १ हजार २७३ बोगस कापसाचे बियाणे पाकीट मिळून आले आहेत.
यामध्ये एका पाकिटाची किंमत एक हजार ४०० रुपये एवढी असून एकूण किंमत १७ लाख ८२ हजार रुपये रकमेचा मुद्देमाल कृषी विभागाच्या जिल्हा भरारी पथकाने जप्त केला आहे. नितीन नंदलाल चौधरी यांच्या विरुद्ध चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पीएसआय जितेंद्र वल्टे करीत आहेत.