जळगाव लाईव्ह न्यूज । २५ नोव्हेंबर २०२१ । सोशल मीडियावरील ओळखीनंतर झालेल्या फसवणुकीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशातच विवाहेच्छुकांच्या संकेतस्थळांवर असलेल्या माहितीची खातरजमा न करताच विश्वास ठेवणाऱ्या पाचोरा येथील एका साॅफ्टवेअर इंजिनिअर तरुणीची अमेरिकेत असल्याचा बहाणा करणाऱ्या तरुणाने २ लाख ५५ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी निवांत चित्रे अशा नावाने संपर्क करणार्या व्यक्तीविरुद्ध फसवणूक व माहिती तंत्रज्ञान कायद्याखाली जळगाव सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत असे की, पाचोऱ्याची रहिवासी ही तरुणी पुण्यात साॅफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करते. मराठी मेट्रेमनी साइटवर ती वर संशोधन करत होती. त्यासाठी साइटवर तिने आपला प्रोफाइल फोन क्रमांकासह अपलोड केला होता. त्या क्रमांकावरून ४ नोव्हेंबरला निवांत चित्रे असे नाव सांगणाऱ्या तरुणाने तिच्याशी संपर्क केला आणि लग्नाची बोलणीही केली.
आपण अमेरिकेतील ग्लासगो येथे राहत असल्याची बतावणी त्याने केली. प्राथमिक बोलणी झाल्यानंतर दोघांचा फोनद्वारे संपर्क वाढला होता. लग्नाचा निर्णय झाल्यानंतर त्या तरुणाने तिला भेटवस्तू पाठवत असल्याचे सांगितले. त्यात सोन्याच्या बांगड्या, सोन्याचा हार, डायमंडचे घड्याळ व एक हजार पाऊंड युके चलन ज्याची भारतीय किमंत एक कोटी रुपये आहे, अशा वस्तू पाठवलेल्या आहेत. दिल्ली विमानतळावर कस्टम व जीएसटी शुल्क भरल्याशिवाय ते पार्सल मिळणार नाही,’ असं सांगून संशयिताने ४ नोव्हेंबरपासून ते २३ नोव्हेंबरपर्यंत २ लाख ५५ हजार ५०० रुपये ऑनलाईन घेतले.
या काळात ना पार्सल आले ना संबंधिताशी संपर्क झाला. पैसे परत मिळण्याचीही शक्यता नाही. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर तरुणीने सायबर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. या तक्रारीवरुन फसवणूक व माहिती तंत्रज्ञान कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे अधिक तपास करत आहेत.