⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

पाचोरा-जामनेर पीजे रेल्वेची मालकी २०१६ पर्यंत ब्रिटिशांकडे होती! वाचा स्पेशल रिपोर्ट

जळगाव लाईव्ह न्यूज | १४ जानेवारी २०२३ | खान्देशाच्या वैभवात भर टाकणार्‍या पाचोरा ते जामनेर रेल्वेस्थानकादरम्यान असलेल्या ‘नॅरोग्रेज’चे रूपांतर ‘ब्रॉडगेज’मध्ये करण्यात येणार आहे. यासाठी रेल्वेच्यावतीने विस्तारीकरण व जमीन अधिग्रणासाठीचे राजपत्र जारी करण्यात आले आहे. त्यादृष्टीने भुसावळ विभागाचे डीआरएम एस. एस. केडिया यांनी १३ जानेवारी २०२३ रोजी निरीक्षण करुन याचा आराखडा निश्‍चित केला आहे. यामुळे आता खर्‍या अर्थाने पीजे रेल्वेच्या कामाला गती मिळाली आहे. भारतातील रेल्वे हे ब्रिटिशकालीन आहे, हे आपणा सर्वांना माहित आहेच, मात्र १९४७ ला भारत स्वतंत्र झाल्यानंतरही २०१६ पर्यंत पाचोरा-जामनेर पीजे रेल्वेची मालकी ब्रिटिशांकडे होती, हे आपणास माहित आहे का?

पाचोरा-जामनेर मार्गावर ब्रिटीश काळापासून पीजे रेल्वे धावते आहे. ब्रिटीश भारत सोडून गेले असले तरी या रेल्वेसंदर्भात त्यांच्यासोबत केला गेलेला करार सन २०१६ पर्यंत कायम होता. या करारामुळे केंद्र सरकारला पीजे रेल्वेच्या कारभारात हस्तक्षेप करता येत नव्हता. हा करार संपल्यानंतर ही रेल्वेलाइन केंद्र सरकारच्या अखत्यारित आल्यानंतर पाचोरा-जामनेर पीजे रेल्वेचे नॅरोगेज मधून ब्रॉडगेज मध्ये रुपांतर करण्यासह तो मार्ग पुढे वाढविण्याच्या हालचालींना वेग आला. २०१६ मध्ये भाजपाच्या खासदार रक्षाताई खडसे यांनी तत्कालिन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याशी पत्रव्यवहार देखील केला होता.

पीजे बचाव रेल्वे समितीचा लढा
कोरोना काळात बंद केलेली ही रेल्वे कायमस्वरूपी बंद करण्याचा घाट रेल्वे प्रशासनाने घातला होता. यानंतर पीजे बचाव रेल्वे समितीने दिलेला लढा, लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा व जनतेच्या रेट्यामुळे हा विषय बारगळला. केंद्र सरकारने पीजे रेल्वेचा समावेश व्यापारीकरणासाठीच्या गतिशक्ती योजनेत केला व हा रेल्वे मार्ग ब्रॉडगेज करून त्याचे मलकापूरपर्यंत विस्तारीकरण करण्याचे जाहीर केल्यानंतर या प्रक्रियेला गती मिळाली आहे. आता रेल्वेच्यावतीने विस्तारीकरण व जमीन अधिग्रणासाठीचे राजपत्र जारी करण्यात आले असून, पाचोरा व जामनेर तालुक्यातील रेल्वे मार्गालगतच्या शेतकर्‍यांना नोटीसा देण्यात आले आहेत. यानंतर भुसावळ विभागाचे डीआरएम एस. एस. केडिया यांनी पाहणी केल्यानंतर स्थानकांवर होणार्‍या वाहतुकीची अपेक्षित पातळी आणि विभागावर चालविल्या जाणार्‍या गाड्यांच्या संख्येनुसार स्थानकांचा लेआउट निश्चित केला आहे. पाचोर्‍यात नॅरोगेज साइटवर प्रस्तावित अप आणि डाउन तिसरी लाइन आणि मुख्य लाइनशी कनेक्टिव्हिटीसह लेआउट प्रस्तावित आहे. लेआउटमध्ये एक एचएल पॅसेंजर प्लॅटफॉर्म, दोन अप आणि डाउन लूप लाइन आणि मुख्य लाइन यांचा समावेश असेल.

असा असे रेल्वे लेआउट

  • वरखेडी- ब्लॉक ११.०० पॅसेंजर प्लॅटफॉर्मसह दोन अप आणि डाउन लूप लाइनसह तीन स्टेशन लेआउट, मेन लाइन, १२० मीटरचे, ए न्ड डी साइडिंग असेल.
  • पिंपळगाव- ब्लॉक ८.२० १९.२० बेट एलएल पॅसेंजर प्लॅटफॉर्मसह एक अप आणि डाउन लूप लाइनसह दोन स्टेशन लेआउट, मुख्य मार्ग असेल.
  • शेंदुर्णी- ब्लॉक ९.३० २८.५० बेट एलएल पॅसेंजर प्लॅटफॉर्मसह एक अप आणि डाउन लूप लाइनसह दोन स्टेशन लेआउट, मुख्य मार्ग असेल.
  • पहूर- ब्लॉक ११.४० ३९.९० तीन स्टेशन लेआउट दोन अप आणि डाउन लूप लाइनसह एका बेटासह एलएल पॅसेंजर प्लॅटफॉर्म, मेन लाइन, गुड्स शेड क्षेत्र असेल.
  • भगदरा- ब्लॉक ७.६० ४७.५० बेट एलएल पॅसेंजर प्लॅटफॉर्मसह एक अप आणि डाउन लूप लाइनसह दोन स्टेशन लेआउट, मुख्य मार्ग.
  • जामनेर- ब्लॉक ६.५० ५४.०० बेट एलएल पॅसेंजर प्लॅटफॉर्म, मुख्य मार्गासह एक अप आणि डाउन लूप लाइनसह दोन स्टेशन लेआउट असेल.
  • वाकी- ब्लॉक १४.०० ६८.०० एलएल पॅसेंजर प्लॅटफॉर्मसह दोन अप आणि डाउन लूप लाइनसह तीन स्टेशन लेआउट, मुख्य मार्ग असेल.
  • बोदवड- विद्यमान १५.९० ८३.९० एक अप आणि डीएन लूप लाइन प्रस्तावित, नवीन लूप लाइन आणि तिसर्‍या लाइनशी कनेक्टिव्हिटीसह वरच्या बाजूला प्रस्तावित आहे.
  • सर्व लूप लाइन ७५३ मीटर सीएसआरच्या असतील आणि द्वि-दिशात्मक (वर आणि खाली) असतील. दोन्ही टोकांना वाळूच्या कुबड्यांची तरतूद असून, सर्व ब्लॉक स्थानकांवर पॅसेंजर प्लॅटफॉर्म ३०० मीटरचे असतील.