जळगाव लाईव्ह न्युज । १४ जुलै २०२२ । आपल्याच समाजातील तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून नंतर लग्नास नकार देणाऱ्या आणि इतरांशीही लग्न करू देणार नाही अशी धमकी देण्यासाठी वारंवार व्हिडिओ काॅल करणाऱ्या तरुणासमोरच एका २१ वर्षीय तरुणीने २४ जून रोजी गळफास घेतला होता. दरम्यान, रुग्णालयात उपचार सुरु असताना अखेर तिचा मृत्यू झाला आहे. दिव्या दिलीप जाधव असे मृत तरुणीचे नाव आहे. तरुणीच्या आत्महत्येला जबाबदार तरुण तसेच त्याच्या आईला अटक करावी, अशी मागणीही तरुणीच्या नातेवाईकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
दिव्या जाधव हिचे नीलेश मंगलसिंग गायकवाडशी दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. ते तासंतास फोनवर बोलत बसायचे. ही बाब लक्षात आल्यावर आणि दिव्याने नीलेशशीच लग्न करण्याचा निर्धार बोलून दाखवल्यावर तिचे हातमजुरी करणारे वडील दिलीप जाधव आणि कुटुंबीयांनी पाचोरा तालुक्यातील तारखेडा येथे जाऊन मुलाचे घर गाठले. त्यांच्या सोबत चार पंचही होते. त्यांनी दोघांच्या लग्नाचा प्रस्ताव दिल्यानंतर नीलेशची आई भडकली. आपल्या कुटुंबाची आणि तुमच्या कुटुंबाची बरोबरी होऊ शकत नाही, असे सांगत त्यांचा अवमान करून त्यांना तिने घालवून दिले.
निघताना यापुढे नीलेशने आपल्या मुलीशी बोलू नये, संपर्क करू नये असे दिलीप जाधव यांनी बजावले. त्यानंतर दिव्यासाठी इतर मुले पाहण्याचा कार्यक्रम सुरू झाला. मात्र, अन्य कोणाशीही तुझे लग्न होऊ देणार नाही, येणाऱ्या मुलाला आपले फोटो आणि कॉल रेकॉर्डिंग पाठवून लग्न मोडेल, अशी धमकी नीलेश व्हिडिओ काॅल करून तिला देत होता. निलेशकडून वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून दिव्याने २४ जून रोजी दुपारी ३ वाजता राहत्या घरात गळफास घेतला.
हा प्रकार नातेवाईकांच्या लक्षात आल्यानंतर तिला तातडीने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान बुधवारी (१३ जुलै) सकाळी ११ वाजेच्या सुमारास दिव्याची मृत्यूशी सुरु असलेली झुंज अपयशी ठरली आणि तिची प्राणज्योती मालविली.
मृतदेह ताब्यात घेणार नाही
मुलीचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकच आक्रोश केला होता. दिव्याच्या मृत्यूला निलेश मंगलसिंग गायकवाड आणि त्याची आई लक्ष्मीबाई मंगलसिंग गायकवाड हे जबाबदार असून त्यांना अटक करा, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा दिव्याचे आई-वडील आणि काका यांनी घेतला होता. याबाबत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनाही मागणीचे निवेदन देण्यात आले आहे.