⁠ 
गुरूवार, मे 2, 2024

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या पाचोरा दौऱ्याला स्थगिती; ‘या’ दिवशी निश्चित होण्याची शक्यता

जळगाव लाईव्ह न्यूज| २१ ऑगस्ट २०२३। राज्य शासनाने सुरू केलेल्या ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमासाठी २६ ऑगस्टला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्यासह सर्व मंत्रिमंडळ पाचोरा येथे येणार आहे, अशी माहिती आमदार किशोर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली होती . राज्यभरात शासन आपल्या दारी हा उपक्रम राबविण्यात येत असला तरी तालुकास्तरावरील हा पहिलाच प्रयोग ठरणार आहे.

‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम जिल्हास्तरावर राबविला जात असून, त्याला मिळणारा प्रतिसाद व शासनाच्या योजनांचा लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणारा लाभ विचारात घेऊन तालुकास्तरावरही हा उपक्रम घेण्याचे निश्चित केले आहे. पाचोरा व भडगाव या दोन्ही तालुक्यांसाठीचा ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम येत्या २६ ऑगस्टला पाचोरा येथे होणार होता. परंतु आता काही कारणास्तव हा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. २ सप्टेंबर रोजी दौरा निश्चित होऊ शकत्तो अशी माहिती आ. किशोरआप्पा पाटील यांनी दिली आहे.

या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी आमदार किशोर पाटील यांनी प्रांताधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सर्व अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. तालुकास्तरावरील हा पहिलाच प्रयोग यशस्वी करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. एम. एम. महाविद्यालयाचे क्रीडांगण ही या कार्यक्रमासाठीची जागा निश्चित करण्यात आली.

सर्व विभागांच्या शासकीय अधिकाऱ्यांनी या संदर्भातील तयारी जवळपास पूर्णत्वास आणली आहे. तालुकास्तरावरील हा पहिलाच कार्यक्रम यशस्वी करण्याचा व राज्यभरात तालुकास्तरावरील कार्यक्रम आदर्श पॅटर्न ठरेल, या दृष्टिकोनातून तयारीला गती देण्यात आली आहे. पाचोरा व भडगाव तालुक्यांतील जनतेने यासाठी उपस्थित राहून शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार किशोर पाटील यांनी केले आहे.