जळगाव लाईव्ह न्यूज । १२ नोव्हेंबर २०२२ । जळगाव शहरातील कचरा संकलनाचा मक्ता वॉटरग्रेस कंपनीला देण्यात आला आहे. शहरात कचरा संकलनाचे काम योग्य पद्धतीने होत नसल्याच्या तक्रारी नागरिक आणि लोकप्रतिनिधी करीत आहेत. जळगाव लाईव्ह न्यूज गेल्या तीन दिवसापासून स्वच्छतेच्या प्रश्नाला वाचा फोडली आहे. जळगाव शहर महानगरपालिकेत आम्ही दरवर्षी न चुकता कर भरतो. हा पैसा असा वाया जाणार असेल तर यामुळे आमच्या पैशाला किंमत आहे की नाही? असा प्रश्न जळगाव शहरातील नागरिकांनी जळगाव लाईव्ह न्यूजशी बोलताना व्यक्त केला आहे.
जळगाव शहर महानगरपालिका दर महिन्याला वॉटरग्रेस कंपनीला जळगाव शहरातील साफसफाई करण्यासाठी दीड कोटी रुपये अदा करत आहे. मात्र नागरिकांना हवी तशी सुविधा जळगाव शहरात मिळत नाही. शहरात कचरा संकलनाचे काम होत असले अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग पाहायला मिळतात. वॉटरग्रेस कंपनीचे काम आणि जळगाव शहरातील परिस्थिती लक्षात घेता जळगाव शहरातील नागरिकांनी या विरोधात जळगाव लाईव्ह न्यूजशी बोलताना खरमरीत प्रतिक्रिया दिल्या आहेत.
जळगावची परिस्थिती पाहता नक्कीच मोठे आर्थिक गणित
जळगाव शहर महानगरपालिकेने इंदोरचा आदर्श घेत एखादा मोठा प्रकल्प या ठिकाणी उभारणे अपेक्षित होता. मात्र लोकप्रतिनिधींमध्ये असलेली उदासीनता आणि प्रशासनाची काम न करण्याची वृत्ती पाहता जळगाव शहरात हे होऊ शकलेले नाही यामागे नक्कीच मोठे आर्थिक गणित आहे, असे किशोर पाटील उर्फ डी.जे.शिवा यांनी सांगितले.
..तर हि निंदनीय बाब
जळगाव शहर महानगरपालिका जर मोठ्या प्रमाणावर कर आकारणी करत असेल तर नागरिकांना सुविधा देणे हे महानगरपालिकेचे कर्तव्य आहे. त्या सुविधा देण्यात महानगरपालिका कुचराई करत असल्याचे आम्हाला वाटत आहे तर दुसरीकडे आमचा पैसा अशा अकार्यक्षम लोकांकडे जर जात असेल तर ही निंदनीय बाब आहे, असे तन्मय पाटील, महाबळ यांनी सांगितले.
आमच्या प्रभागात साफसफाई होत नाही
आमच्या प्रभागाचा विचार केला तर आमच्या प्रभागात खूप कचरा साचला आहे. महानगरपालिकेच्या गलथान कारभारामुळे या ठिकाणी साफसफाई होत नाही. याकडे महानगरपालिकेने लक्ष देणे अतिशय गरजेचे आहे, असे भगवान सोनवणे, शिवाजीनगर यांनी सांगितले.
मनपाला साफसफाई दिसते कि नाही
आम्ही दरवर्षी न चुकता कर भरत असतो. हा कर आमच्या मेहनतीचा पैसा आहे. यामुळे आम्हाला मनपातर्फे सुविधा मिळाव्यात अशी आमची साधी अपेक्षा आहे मात्र त्या मिळत नाहीत. दर महिन्याला जर मनपा दीड कोटी रुपये साफसफाईसाठी देत असेल तर जळगाव शहरात मनपाला साफसफाई दिसते की नाही हा प्रश्न आहे? कुठेच साफसफाई होताना दिसत नाहीये, कचऱ्याचे ढीग संपूर्ण शहरामध्ये आहेत, असे पराग जगताप, हौसिंग सोसायटी यांनी सांगितले.
आमच्या सहनशक्तीचा अंत पाहू नये
महानगरपालिका प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधींना असं वाटत आहे की नागरिक शांत आहेत. मात्र त्यांनी लक्षात ठेवावा की नागरिक शांत आहेत ते मूर्ख नाही, यामुळे आता आमच्या सहनशक्तीचा अंत पाहणं या प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी बंद केले पाहिजे, असे शकील बागवान, शिवाजीनगर यांनी सांगितले.