नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी विभागनिहाय बैठकांचे आयोजन
जळगाव लाईव्ह न्यूज । ११ नोव्हेंबर २०२१ । महापौर व उपमहापौर यांच्या कार्यालयाकडे नागरिकांकडून करण्यात येत असलेल्या तक्रारी, सूचनांचा निपटारा होत नसल्याने व या तक्रारी, सूचनांचा तातडीने निपटारा होण्यासाठी विभागनिहाय आढावा बैठकांचे नियोजन उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्याकडून करण्यात आले आहे. याबाबतचे आदेशही त्यांनी नुकतेच काढले आहेत.
महापौर व उपमहापौर यांच्या कार्यालयाकडे नागरिकांकडून अनेक तक्रारी, सूचना करण्यात येत असतात. त्या तक्रारी व सूचना पुढील कार्यवाहीसाठी महापालिकेच्या संबंधित विभागाकडेही पाठविल्या जातात. परंतु, त्या संबंधित विभागांकडून त्या तक्रारी व सूचनांवर अपेक्षित कार्यवाही केली जात नाही. त्यामुळे नागरिकांकडून आलेल्या तक्रारी, सूचनांचा निपटारा होण्यासाठी उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्याकडून विभागनिहाय आढावा बैठकीचे नियोजन करण्यात आले आहे. तसे आदेशही त्यांनी सर्व विभागप्रमुखांना दिले आहेत.
प्रत्येक महिन्याच्या पहिल्या व शेवटच्या मंगळवारी आरोग्य व बांधकाम विभाग, पहिल्या व शेवटच्या बुधवारी पाणी पुरवठा व विद्युत विभाग व पहिल्या व शेवटच्या गुरुवारी आस्थापना व अतिक्रमण विभागाची आढावा बैठक घेण्यात येणार आहे. उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या दालनात या आढावा बैठक होणार आहेत.