जळगाव लाईव्ह न्यूज । ८ एप्रिल २०२२ । सामाजिक न्याय विभागातर्फे ८ ते १६ एप्रिलपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना स्वाधार शिष्यवृत्ती, शेतकऱ्यांना मिनी ट्रॅक्टर वितरण, पथनाट्य, शिबिरे, स्वाभिमान मेळावा असे विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. |
८ एप्रिल रोजी जिल्हा व विभागस्तरावर कार्यक्रम आयोजित करून स्वाधार शिष्यवृत्ती, मिनीट्रॅक्टर आदी लाभार्थींना प्रातिनिधिक स्वरूपात वितरण करण्यात येईल. ९ रोजी ज्येष्ठ नागरिक योजनांच्या जनजागृती संदर्भात मेळावे व जिल्हा आरोग्य विभागाच्या समन्वयाने विभागाच्या शैक्षणिक आस्थापनांमध्ये रक्तदान शिबिर, १० रोजी समतादूतामार्फत ग्रामीण व शहरी भागात लघुनाट्य, पथनाट्य आदी माध्यमातून विभागाच्या योजनांच्या माहितीबाबत प्रबोधन, ११ रोजी महात्मा जोतिराव फुले यांची जयंती साजरी करून विविध वक्त्यांना निमंत्रित करून महात्मा फुलेंच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्यात येईल, १२ रोजी मर्जिंन मनी योजनेच्या जनजागृती व लाभ मिळालेल्या लाभार्थींसाठी विशेष कार्यशाळा, १३ रोजी संविधान जागर, १४ राेजी सामाजिक न्याय विभागाच्या अधीनस्त असलेल्य सर्व कार्यालये, शाळा, वसतिगृहे इत्यादी सर्व आस्थापनांमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधींना निमंत्रित करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम आयोजित करून त्याठिकाणी व्याख्याने, चर्चासत्रे आदी कार्यक्रम घेतले जातील. त्याचबरोबर कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान मेळावा आयोजित करून बाबासाहेबांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या कार्याची माहिती देणारे व्याख्यान आयोजित केले जातील. याच दिवशी सर्व जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यरत राहून जात पडताळणी प्रमाणपत्र ऑनलाइन पद्धतीने वितरित करतील, १५ राेजी प्रत्येक सहायक आयुक्त कार्यालयात महिला मेळावे आयोजित करून बाबासाहेबांच्या महिलांविषयी कार्याची माहिती देणारे कार्यक्रम हाेतील. तृतीयपंथी जनजागृती व नोंदणी करून ओळखपत्र देण्याचा उपक्रम राबवला जाईल. १६ राेजी ग्रामीण व शहरी भागातील अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्त्यामध्ये स्वच्छता करणे, लाभ मिळालेल्या व्यक्तींचे मनोगत जाणून घेणे आदी उपक्रम राबवून समता कार्यक्रमाचा समारोप हाेईल, असे समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील यांनी सांगितले. |