⁠ 
गुरूवार, जुलै 25, 2024

जळगावात राष्ट्रीय राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन ; प्रलंबित खटले असणाऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ फेब्रुवारी २०२४ । वर्षानुवर्ष प्रलंबित राहणारे खटले, आर्थिक चणचण, वेळेचा अपव्यय या सर्व गोष्टी टाळण्यासाठी व आपसात सामोपचाराने तडजोड घडवुन वाद मिटवुन घेण्याकरीता राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार संपुर्ण देशात दि 3 मार्च, 2024 रोजी एकाच दिवशी राष्ट्रीय लोकअदालत आयोजित करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव तर्फे देण्यात आली.

महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांनी दिलेल्या निर्देशानुसार विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा वकिल संघ जळगाव यांचे संयुक्त विद्यमाने ही राष्ट्रीय लोकअदालत होईल. जळगाव येथे जिल्हा व सत्र न्यायालयाचे आवारात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, जळगाव एम. क्यु. एस. एम. शेख यांचे अध्यक्षतेखाली लोकअदालतीस प्रारंभ होईल. या लोक अदालतीसाठी जिल्हा वकिल संघ, जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महानगरपालिका आयुक्त यांचे सहकार्य लाभणार आहे.

यावेळी मोटार वाहन, ट्रॉफीक चलान, भूसंपादन, धनादेश अनादर, वैवाहिक खटले, मोटार अपघात खटले, म्युनिसीपल अपील, दिवाणी व फौजदारी प्रकरणे, न्यायालयात प्रलंबित इतर खटले इ. चे व खटला दाखलपूर्व प्रकरणे तसेच एकूण ज्या खटल्यांमध्ये कायद्याने तडजोड करता येते असे संपूर्ण खटले तडजोडीने निकाली काढण्यासाठी ठेवण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे जळगाव येथील औद्योगिक न्यायालय, कामगार न्यायालय, सहकार न्यायालय तसेच ग्राहक तक्रार निवारण मंच येथील तडजोडयोग्य प्रकरणे देखील त्या-त्या न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये निकाली केले जाणार आहेत. राष्ट्रीयकृत बँका, कंपन्या यांचे प्रलंबित असलेल्या दिवाणी व फौजदारी खटल्यांमध्ये मोठया प्रमाणात रक्कम वसुली होवुन मिळण्याची शक्यता आहे. वादपुर्व खटल्यामध्ये बॅंका व कंपन्या यांनी थकित रकमेमध्ये सुट देण्याबाबत प्रस्तावित केलेले आहे. तरी याबाबत नागरीकांनी लाभ घ्यावा. ज्या पक्षकारांना तडजोडीने आपली प्रकरणे निकाली काढायचे असतील अशा संबधित सर्व पक्षकार व त्यांचे अधिवक्ता यांनी उपस्थित राहुन तडजोडीने आपआपले खटले निकाली काढावे. तसेच ऐनवेळी ज्या पक्षकारांना आपले खटले तडजोडीने निकाली काढण्यासाठी ठेवावयाचे असतील त्यांनासुद्धा ऐनवेळी खटले निकाली काढण्याची संधी देण्यांत आलेली आहे. तरी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा व जास्तीत जास्त खटले दि. 3 मार्च रोजीच्या राष्ट्रीय लोकअदालतीत सामोपचाराने निकाली काढावे, असे आवाहन सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव यांनी केले आहे.