जळगाव लाईव्ह न्यूज । २७ ऑक्टोबर २०२४ । महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी रावेर मतदार संघातून काँग्रेसने विद्यमान आमदार शिरीष चौधरी यांचे पुत्र धनंजय चौधरी यांना उमेदवारी जाहीर केलीय. मात्र धनंजय चौधरी यांना उमेदवारी दिल्याने काँग्रेसचे पदाधिकारी नाराज झाले असून त्यांनी बंडखोरी करण्याचे ठाणले आहे.
लोकनियुक्त नगराध्यक्ष दारा मोहम्मद यांनी रावेर विधानसभेतून तिकीट मिळावे अशी काँग्रेस पक्षाकडे मागणी केली होती. मात्र काँग्रेसने धनंजय चौधरी यांना उमेदवारी जाहीर केल्यांनतर काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण होऊन इच्छुक उमेदवारांनी घराणेशाहीवर नाराजी व्यक्त केली आहे.
रावेर विधानसभेतून दारा मोहम्मद यांनी निवडणुकीसाठी तयारी सुरु केली होती. मात्र पक्षाकडून त्यांना डावलले गेल्याने त्यांनी रावेर विधानसभेतून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यामुळे रावेर विधानसभेत काँग्रेसचे अधिकृत उमेदवार धनंजय चौधरी यांच्यासमोर दारा मोहम्मद यांचे मोठे आव्हान असणार
मी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली होती. मात्र त्यांनी मला डावलून कोणताही राजकीय अनुभव नसलेल्या धनंजय चौधरी यांना उमेदवारी जाहीर केली. एकप्रकारे चौधरी परिवाराने घराणेशाही चालवली आहे. माजी मंत्री मधुकरराव चौधरी यांच्यानंतर आमदार शिरीष चौधरी आणि आता धनंजय चौधरी असा वारसा चालवलेला आहे. त्यामुळे निष्ठावान काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी फक्त सतरंजी आणि यांचे झेंडे पकडायचे का? असा संतप्त सवाल मोहम्मद यांनी उपस्थित केला.
दरम्यान, काँग्रेसचे जिल्ह्यातील एकमेव आमदार असलेले शिरीष चौधरी हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे यंदा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नसून त्यांनी तशी जाहीर घोषणा केली आहे. त्यांच्याऐवजी त्यांचे पुत्र धनंजय चौधरी यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. दुसरीकडे महायुतीकडून भाजपचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांना उमेदवारी जाहीर झालीय.