एक लाख शस्त्रक्रियांचा टप्पा ओलांडण्याचा संकल्प..!

जळगाव लाईव्ह न्यूज । जेवढे मोठे स्वप्न असतात, तेवढाच मोठा संघर्ष असतो आणि जेवढा मोठा संघर्ष तेवढेच मोठे यश असते. या उक्तीचा प्रत्यय डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील हभप जगन्नाथ महाराज अंजाळेकर नेत्रालयाचे नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. नि.तु. पाटील यांच्या कार्यातून आलेला दिसून येतो. नेत्र विभागांतर्गत डॉ. नि.तु. पाटील यांनी ३० हजार मोतीबिंदू शस्त्रक्रियांचा टप्पा ओलांडून नवा विक्रम करीत भुसावळसारख्या तालुक्याच्या ठिकाणाहून वैद्यकीय क्षेत्रात एक वेगळा ठसा उमटविला आहे.
डॉ. नि.तु. पाटील यांच्या या थक्क प्रवासाविषयी त्यांनी सांगितले की, नाशिक येथील डॉ. वसंतराव पवार मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात एमबीबीएस झाल्यावर त्यांनी नेरुळ, मुंबई ला तेरणा मेडिकल कॉलेज मध्ये डीओएमएस केले. त्याकाळात पहिली मोतीबिंदू शस्त्रक्रिया दि. २१ सप्टेंबर २००५ ला हरभजन सिद्धा या रुग्णावर विभाग प्रमुख डॉ. ज्योती पडाळे आणि डॉ. राजपाल उसनाळे यांच्या मार्गदर्शना खाली वाशी येथे सामान्य रुग्णालयात केली. पुढे मग बांद्रा भाभा रुग्णालय या ठिकाणी काही काळ सेवा दिली. यानंतर जे.जे. रुग्णालयात पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने आणि डॉ. रागिणी पारेख याच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरामध्ये सक्रिय सहभाग घेता आला.
यासोबत मोतीबिंदू ऑपरेशन बद्दल अधिक सुलभता शिकत पुढे कूपर रुग्णालय,मुंबई आणि नँब हॉस्पिटल,चिपळूण येथील १४ महिन्याच्या काळामध्ये ८६० मोतीबिंदू ऑपरेशन झाली. जळगावला आल्यावर नेत्रज्योती हॉस्पिटल आणि नेत्रम हॉस्पिटल या ठिकाणी ६१३ शस्त्रक्रिया केल्या. पुढे कायमस्वरूपी १ मे २०११ ला डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज व रुग्णालय या ठिकाणी रुजू झाल्यावर संपूर्ण रावेर लोकसभा मतदारसंघांतील चोपडा, जामनेर, बोदवड, मुक्ताईनगर, मलकापूर, नांदुरा, भुसावळ या तालुक्यांमध्ये मोफत मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियान यशस्वीरित्या राबविले.
गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्या डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील,डॉ.अनिकेत पाटील तसेच डॉ. एन एस आर्वीकर,डॉ. प्रशांत सोळंके, डॉ. प्रेम पंडित, प्रमोद भिरुड यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमधील विविध भागात मोतीबिंदू मुक्त अभियान सुरू असून रुग्णांचा ओढा हा डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजमध्ये दिवसेंदिवस वाढत आहे आणि त्याचीच परिणीती म्हणून हा ३०००० चा टप्पा गाठण्यामध्ये झाल्याचे डॉ. नि.तु. पाटील यांनी सांगितले.एक डोळा असलेल्या रूग्णांना दिलासा…!रूग्णाला एक डोळाच असेल तर कुणीही जोखीम स्विकारत नाही. ज्या रुग्णांचा एक डोळा हा काही कारणास्तव निकामी झाला आहे आणि दुसर्या डोळ्यात मोतीबिंदू झाला आहे,अशा रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया ही फार जोखमीची असते. एक चूक रुग्णाला अंधत्व देवू शकते. पण डॉ.नि.तु पाटील यांनी मात्र अशा ६०० च्या वर रूग्णांना अगदी हसतखेळत यशस्वीपणे दृष्टी प्रदान केली. सकाळी ४ वाजता नेत्र शस्त्रक्रिया सुरू होतात….!डॉ.नि.तु. पाटील यांचा दिवस पहाटे ३ वाजता सुरू होतो. ते डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात नेत्र शस्रक्रियासाठी पहाटे ४ वाजेच्या सुमारास हजर राहतात. त्यांच्या सोबत ११ रेसिडेंट आणि ५ सहकारी वर्ग उपस्थित असतो.
विशेषतः डॉ. उल्हास पाटील आणि त्यांची टीम पण सकाळी हजर असते. वैद्यकीय शिक्षणाबरोबरच विविध विषयांत प्रावीण्य…!डॉ. नि.तु. पाटील यांनी वैद्यकीय क्षेत्रामध्ये एमबीबीएस,डीओएमएस,एफसिपीएस,पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा हॉस्पिटल मॅनेजमेंट(पुणे विद्यापीठात प्रथम)या सोबत एलएलबी,डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबल वेल्फेअर, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मेडिकल ज्युरीसप्रुडन्स अँड टॉक्सिकॉलॉजि(उमवी विद्यापीठात प्रथम),एमबीए,एमए,परत एम ए आणि असोसिएट फेलो इन इंडस्ट्रियल हेल्थ आणि पत्रकारिेतेचा देखील कोर्स केला आहे. अश्या विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळवत त्यांच्या नावासमोर तब्बल ११ डिग्री आहेत.नर्मदा परिक्रमावासी एकमेव नेत्रतज्ज्ञ…!वैद्यकीय क्षेत्राबरोबर अध्यात्मिक क्षेत्राची आवड असलेले असल्याने डॉ. नितु पाटील यांनी ६ एप्रिल २०२३ ते २३ जुलै २०२३ या काळामध्ये पायी चालत ३ हजार सहाशे नऊ किलोमीटर अंतर पार करत नर्मदा माता परिक्रमा १०८ दिवसांत यशस्वीपणे पूर्ण केलेली आहे.डॉ. उल्हास पाटील यांचे नामनिराळे अभिष्टचिंतन..!वाढदिवसानिमीत्त अभिष्टचिंतन करण्याच्या अनेक पध्दती आहेत. मात्र जेवढे वय तेवढ्याच शस्त्रक्रिया करून अभिष्टचिंतन करणे हे नामनिराळेच आहे. गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांचा वाढदिवस दरवर्षी जल्लोषात साजरा केला जातो. नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. नि.तु. पाटील हे डॉ. उल्हास पाटील यांच्या वाढदिवसानिमीत्त जेवढे वय तेवढ्या शस्त्रक्रिया करून त्यांचे अभिष्टचिंतन करतात. या उपक्रमाबद्दल खुद्द डॉ. उल्हास पाटील यांच्यासह अनेकांनी डॉ. नि.तु. पाटील यांचे कौतुक केले आहे