जळगाव लाईव्ह न्यूज । ७ एप्रिल २०२२ । खान्देश सेंट्रल मॉलच्या परिसरातील रस्ते वाहतुकीसाठी खुले करण्याचे आदेश असतानाही गेट लावून बंद करण्यात आले आहेत. वाहनधारकांना मज्जाव केला जात असल्याने ॲड. विजय भास्कर पाटील यांनी मनपा आयुक्तांकडे तक्रार केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने नगररचना विभागातील अधिकाऱ्यांनी सदर रस्त्याची पाहणी करुन सात दिवसात रस्ता मोकळा करण्याची नोटीस दिली आहे.
रेल्वेस्थानकाकडे जाण्यासाठी खान्देश सेंट्रलच्या आवारातून रस्ता तयार करण्यात आला आहे. त्यासाठी रेल्वे प्रशासनाची भिंत देखील पाडण्यात आली होती. दरम्यान, सुरुवातीला काही दिवस हा रस्ता खुला होता. मात्र, गेल्या काही वर्षापासून नेहरू चौक व गोविंदा रिक्षा स्टॉपच्या बाजूने सदर रस्त्याला गेट लावून बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे रात्री रेल्वेने जाणाऱ्या व येणाऱ्या प्रवाशांना प्रवेश दिला जात नव्हता. यासंदर्भात राष्ट्रवादी अर्बन सेलतर्फे माजी नगरसेविका अश्विनी देशमुख यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी तक्रारीद्वारे रस्ता मोकळा करण्याची मागणी केली होती. या तक्रारीची ॲड. विजय भास्कर पाटील, विनोद देशमुख व कार्यकर्त्यांकडून सातत्याने पाठपुरावा सुरू होता.
दरम्यान, महापालिकेच्या नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांनी खान्देश सेंट्रल येथील बंद केलेल्या रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. त्यात पूर्व-पश्चिम व उत्तर-दक्षिण २४ मीटर रूंदीच्या रस्त्यावर एका बाजूला गेट बंद करून सार्वजनिक वापरासाठी रस्ता बंद केल्याचे आढळून आले. सहायक संचालक अशोक करवंदे यांनी तक्रारीच्या अनुषंगाने सात दिवसांत गेट काढून घेण्याचे तसेच रस्त्याचा सार्वजनिक वापर करता मोकळा मोकळा करण्याचे आदेश नोटीसद्वारे दिले आहेत.
खान्देश सेंट्रलचे सर्व रस्ते सार्वजनिक वापरासाठी खुले ठेवण्याचे संबधितांनी मनपाला स्टॅम्पवर लिहून दिले असतांना आता इथे गेट लावून वापरण्यासाठी मज्जाव केला जात आहे. त्यामुळे मनपाने हा रस्ता सार्वजनिक वापरासाठी खुला करावा अन्यथा आम्ही नेहरु चौक व टॉवर चौक रस्त्याला गेट लावून वाहतुक बंद करु असा इशारा ॲड. विजय भास्कर पाटील यांनी मनपा आयुक्तांना दिला होता.