जळगाव लाईव्ह न्यूज । १० जानेवारी २०२५ । जळगाव जिल्ह्यातील अमळनेर शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे, ज्यामध्ये एका तरुणाचा मोबाईल हॅक करून त्याच्या बँक खात्यातून १ लाख रुपये काढून घेण्यात आले. ही घटना ७ जानेवारी रोजी दुपारी साडेचार वाजता घडली, ज्यामध्ये अज्ञात सायबर गुन्हेगारांनी ओटीपीच्या माध्यमातून ही फसवणूक केली.
भावेश गणेश पाठक (वय ३२ वर्ष) हे शिवशक्ती चौक, अमळनेर येथे राहतात. ते पिठाची गिरणी चालवून आपला उदरनिर्वाह करतात. मंगळवारी दुपारी साडेचार वाजता त्यांना अनेक मॅसेजेज आले, ज्यामध्ये त्यांचा मोबाईल हॅक केल्याचे दिसून आले. अज्ञात व्यक्तीने त्यांच्या मोबाईलवर आलेल्या ओटीपीच्या माध्यमातून त्यांच्या बँक खात्यातून परस्पर १ लाख रुपये काढून घेतले.
या घटनेची जाणीव झाल्यानंतर, भावेशने तातडीने बँकेत जाऊन त्यांचे बँक खाते फ्रीझ केले. त्यानंतर त्यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. गुरूवार, ९ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता अज्ञात मोबाईल धारकावर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक विकास देवरे हे करीत आहेत.