जळगाव लाईव्ह न्यूज । महामार्ग सहा वरील जळगाव-भुसावळ दरम्यानच्या साकेगाव (ता भुसावळ) जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत प्रौढाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आलीय. या अपघाताप्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे

मिळालेल्या माहितीनुसार, जळगावकडून भुसावळच्या दिशेने जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील साकेगाव येथील एका चहाच्या दुकानासमोर एक अज्ञात व्यक्ती रस्ता ओलांडत असावी किंवा रस्त्याच्या कडेने जात असावी. याच दरम्यान, भरधाव वेगाने येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने या व्यक्तीला जोरदार धडक दिली.यात सदर व्यक्तीला गंभीर दुखापत झाली आणि तिचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच साकेगाव येथील पोलीस पाटील गणेश शांताराम भोई (वय ३१) यांनी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पूजा अंधारे करत आहेत.









