जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जुलै २०२५ । जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यातील प्रसिद्ध शिरसाळा येथील मारूतीच्या दर्शनासाठी मित्रांसोबत जात असलेल्या तरुणावर काळाने झडप घातली आहे. भरधाव डंपरने दुचाकी धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात धरणगावच्या वराड येथील १९ वर्षीय हर्षल राजू पाटील याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला. कुणाल गोकुळ पाटील (रा. वराड, ता. धरणगाव) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून ही घटना आज शनिवारी १९ जुलै रोजी सकाळी ६ वाजता नशिराबाद गावाजवळील टोल नाक्याजवळ घडली आहे. एकुलता एक मुलगा गेल्याने आईवडीलांनी प्रचंड आक्रोश केला.

या घटनेबाबत असे की, धरणगाव तालुक्यातील वराड गावात हर्षल पाटील हा तरूण आईवडील आणि बहिण यांच्या सोबत वास्तव्याला होता. बोदवड तालुक्यातील शिरसाळा येथी जागृत मारूतीचे दर्शन घेण्यासाठी जिल्ह्यासह बाहेरून दर शनिवारी अनेक भाविक जात असतात. त्यांच पध्दतीने हर्षल पाटील हा गावातील ८ ते १० मित्रांसोबत दुचाकीने शनिवारी १९ जुलै रोजी पहाटे दर्शनासाठी निघाला होता.

त्यावेळी त्याच्या दुचाकीवर त्याचा मित्र कुणाल पाटील हा होता. सकाळी ६ वाजेच्या सुमारास नशिराबाद गावाजवळील टोल नाकाजवळील पुलावरून जात असतांना भरधाव डंपरने हर्षलच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत हर्षल पाटील हा तरूण ठार झाला तर सोबत असलेला कुणाल पाटील हा गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. हर्षल हा आईवडीलांचा एकुलता एक मुलगा असल्याने नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता. याबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे.
दरम्यान,जळगाव जिल्ह्यात सध्या अवैध वाळू माफियांचा धमाकूळ काहीसा कमी झाला असला तरी अनेक डंपर चालक बेभान होऊन वाहन चालवतात. यामुळे अनेकवेळा डंपरच्या धडकेमुळे अपघात झाले. यात अनेकांना जीवावर मुकावे लागले आहे. अशा डंपर चालकांवर योग्य कारवाई करण्याची गरज असून भविष्य असे अपघात होऊ नये याचीही खबरदारी घेतली पाहिजे.







