पहिल्याच दिवशी ३० गाळेधारकांनी केला ७० लाखाचा भरणा
जळगाव लाईव्ह न्यूज । २६ ऑक्टोबर २०२१ । राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीत झालेली चर्चा व त्यानुसार भाड्याची किमान २५ टक्के रक्कम भरण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत विविध मार्केटमधील गाळेधारकांनी ५ ते १० लाखांपर्यंतची रक्कम भरण्याची तयारी केली आहे. पहिल्याच दिवशी ३० गाळेधारकांनी ७० लाख रुपये भरणा केल्याने गाळेधारकांच्या मागण्यांसंदर्भातदेखील सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता वर्तविली जात असून, पैसे भरण्यासाठी शेवटचे पाच दिवस शिल्लक असल्याने आठवडाभरात उर्वरित गाळेधारकही थकबाकी रक्कम जमा करतील, असे गाळेधारक संघटनेचे अध्यक्ष डॉ. शांताराम सोनवणे यांनी सांगितले.
सविस्तर असे की, गाळेधारक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी दुपारी महापालिकेचे उपायुक्त प्रशांत पाटील यांची भेट घेतली. यावेळी थकीत भाड्याच्या रकमेचे धनादेश अदा केले. मुंबई येथील भेटीदरम्यान नगरविकास मंत्री शिंदे यांनी गाळेधारकांना भाड्याची रक्कम भरण्याचे आदेश दिले होते. आधी पैसे भरा त्यानंतर मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन या वेळी दिले होते. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार गाळेधारकांनी पहिले पाऊल उचलले आहे. पैसे भरण्यासाठी महापालिका प्रशासनाने थकबाकीदार गाळेधारकांना ३१ ऑक्टोबरपर्यंत भाड्याची रक्कम भरण्याचे आवाहन केले होते.
महापालिकेच्या आवाहनानुसार संघटनेचे अध्यक्ष डॉ. शांताराम सोनवणे यांनी गेल्या आठवडाभरात वेगवेगळ्या मार्केटमधील गाळेधारकांची भेट घेतली. मंत्री शिंदे यांच्या बैठकीत झालेली चर्चा व त्यानुसार भाड्याची किमान २५ टक्के रक्कम भरण्याचे आवाहन केले. त्यानुसार विविध मार्केटमधील गाळेधारकांनी ५ ते १० लाखांपर्यंतची रक्कम भरण्याची तयारी केली आहे. पहिल्याच दिवशी ३० गाळेधारकांनी ७० लाख रुपये भरणा केल्याने गाळेधारकांच्या मागण्यांसंदर्भातदेखील सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
दरम्यान, प्रशासनाने मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांकडून थकीत भाड्याची रक्कम वसूल करण्यासाठी विशेष मोहीम राबवली आहे. प्रशासनाने आतापर्यंत मनपाने ८ कोटींची वसुली केली आहे. महापालिकेने ताब्यात घेतलेल्या १०० गाळ्यांचा लिलावाची प्रक्रिया देखील सुरू केली आहे