⁠ 
शनिवार, मे 4, 2024

नागरिकांच्या जीवाशी हेळसांड; जळगांव-पाचोरा महामार्गावर खड्डे, काँक्रीट देखील उखडले!

जळगाव लाईव्ह न्यूज| १२ ऑगस्ट २०२३। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून करण्यात आलेल्या जळगाव-नांदगाव रस्त्यावर अवघ्या दोन वर्षात मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. काँक्रीटच्या या रस्त्यावर खड्डे पडल्याने रात्रीच्या वेळी दुचाकी स्लिप होऊन अपघात होत आहेत.

जळगाव ते चाळीसगावपर्यंत संपूर्ण रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण केल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रहदारी सुरू झाली आहे. या मार्गाव जळगाव ते शिरसोली दरम्यान अनेक ठिकाणी काँक्रीट उखडले आहे. तर रस्त्याच्या मधोमध असलेला गॅप वाढत जात असल्याने दुचाकी स्लिप होण्याचे प्रमाण वाढत आहे.

गुलाबराव देवकर ते जैन हिल्स दरम्यान हे खड्डे मोठ्या प्रमाणात आहे. मोहाडी रस्ता ते नेहरूनगर या मार्गावरील रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, हा रस्ता फोडून महापालिकेने काही ठराविक ठिकाणी पेव्हर ब्लॉकचे ठिगळ लावले आहे.

या मार्गावरून जास्त वर्दळ वाढल्यामुळे ज्या ठिकाणी पेव्हर ब्लॉक लावले आहे, ती जागा खचली आहे. या मार्गावरील दोन्ही बाजूने पथदिवे नसल्यामुळे अंधार असतो. वाहनधारकांना रस्त्यावरील पेव्हर ब्लॉकचा अंदाज येत नसल्याने या ठिकाणी गाडी जोरात आदळली जात आहे. तसेच बऱ्याच ठिकाणी रस्त्यांवर अनावश्यक स्पीड ब्रेकर देखील तयार केल्याचे दिसून येते. जे नागरिकांसाठी गैरसोयीचे ठरतं आहे.