जळगाव लाईव्ह न्यूज । १६ ऑगस्ट २०२२ । स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वराज्य महोत्सवातंर्गत ‘समूह राष्ट्रगीत गायन’ हा उपक्रम जिल्ह्यात बुधवार दि. 17 ऑगस्ट, 2022 रोजी सकाळी 11-00 वाजता राबविण्यात येणार असून या उपक्रमांत शाळा, महाविद्यालय, संस्था, नागरिक यांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.
या उपक्रमातंर्गत 17 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता समूह राष्ट्रगीत गायन करणे अपेक्षित आहे. राष्ट्रगीत गायनासाठी जिल्हास्तर,तालुकास्तर, ग्रामस्तरावरील सर्व खाजगी, शासकीय तसेच इतर सर्व प्रकारच्या शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, विद्यापीठामधील विद्यार्थी, शिक्षक, खाजगी आस्थापना, व्यापारी प्रतिष्ठाने, संस्था, शासकीय व निमशासकीय कार्यालय, केंद्र व राज्य शासनांचे संबंधित कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, राजकीय पदाधिकारी यांनीही या उपक्रमात सहभागी व्हावे. तसेच समूह राष्ट्रगीत गायनाच्या वेळी जाणते-अजाणतेपणे राष्ट्रगीताचा अवमान होऊ नये याची दक्षता घ्यावी.
राष्ट्रगीत गायनासाठी विद्यार्थ्यांनी मोकळे पटांगण, वर्ग खोली, किंवा हॉल या ठिकाणी एकत्रित उपस्थित राहावे. ग्रामस्तरावर, वार्ड स्तरावर, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायतीतील सर्व प्रशासकीय अधिकारी व पदाधिकारी यांनी या कार्यक्रमांत सक्रीय सहभागी व्हावे असे आवाहन अभिजित राऊत यांनी केले आहे.