भीषण अपघाताने महाराष्ट्र हादरला ; खासगी बस दरीत कोसळून 13 जणांचा मृत्यू

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ एप्रिल २०२३ । राज्यात होणाऱ्या अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच असल्याचे दिसून येत आहे. अशातच आता एक भीषण अपघाताच्या घटनेने महाराष्ट्र हादरला आहे. जुन्या पुणे मुंबई महामार्गावर खासगी बस दरीत कोसळली आहे. या भीषण अपघातात 12 ते 13 जणांचा जागीच मृत्यू झाला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर 20 ते 25 जण जखमी झाले आहेत. यातील 16 लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे.

ही घटना बोरघाटातील शिंगरोबा मंदिर जवळ आज पहाटे ४ वाजताच्या सुमारास घडली. ही बस पुण्याहून मुंबईकडे जात होती. बसमध्ये सुमारे 40 ते 45 प्रवासी प्रवास करीत होते. पहाटे चारच्या सुमारास चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती.

या अपघातात 12 ते 13 लोक ठार झाल्याचं सांगितलं जातं. तर 20 ते 25 लोक जखमी झाले आहेत. आतापर्यंत 16 प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

अपघातातील सर्व जखमींना खोपोली नगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आणखी प्रवासी बसमध्ये अडकलेले आहेत. या सर्वांना बाहेर काढण्यासाठी बचावपथकांकडून युद्धपातळीवर कार्य सुरू आहे.