जळगाव लाईव्ह न्यूज । १४ फेब्रुवारी २०२६ । जळगाव जिल्ह्यात एकीकडे अवैध वाळूमाफियांनी धुमाकूळ घातला असून त्यात वाळू वाहतूक करणाऱ्या सुसाट वेगाने धावणाऱ्या डंपरच्या धडकेत अनेकांना जीवावर मुकावे लागले आहे. अशातच जळगावात भरधाव डंपरने एका वृद्धाला चिरडल्याची धक्कादायक घटना घडली.

जळगाव शहरातील कालिंका माता चौकात डंपरने भाजीपाला घेऊन घरी जाणाऱ्या प्रभाकर पाटील (वय ५७) यांना चिरडले. डंपरचे चाक थेट त्यांच्या तोंडावरून गेल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेनंतर संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले आणि डंपरवर दगडफेक करत तोडफोड केली.

दरम्यान डंपर चालक मोबाईलवर बोलत असल्यामुळे अपघात झाला असून चाक थेट तोंडावरून गेल्यामुळे वृद्धाचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठे तणावाचे वातावरण निर्माण झाले असून दंगा नियंत्रक पथकासह पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.

याच कालिंका माता चौकात साधारण वर्षभरापूर्वी एका बालकाचाही डंपरच्या धडकेत मृत्यू झाला होता. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप असून त्यांनी विविध मागण्या केल्या आहेत. घटनास्थळी शहराचे आमदार राजूमामा भोळे, स्थानिक नगरसेवक सुनील वामनराव खडके, डॉ. विश्वनाथ खडके यांनी उपस्थिती देऊन माहिती जाणून घेतली. मृतदेहाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी कुटुंबीयांनी रुग्णालयात मन हेलावणारा आक्रोश केला. मयत प्रभाकर पाटील हे हातमजुरी करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते.









