⁠ 
रविवार, मे 12, 2024

बोरांच्या रूपाने असलेली ओळख मेहरुणला पुन्हा मिळवून देऊ – महापौर जयश्री महाजन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जुलै २०२१ । चवीला अतिशय गोड अन् रुचकर म्हणून मेहरुणच्या बोरांची सर्वदूर असलेली ओळख दिवसागणिक लोप पावत चालली आहे. ती पुनश्च मिळवून देण्यासाठी मी जळगाव शहरातील प्रथम नागरिक अर्थात महापौर या नात्याने ‘मराठी प्रतिष्ठान’च्या फळबाग व रानमेवा प्रकल्पाच्या आयोजनाचे मनापासून स्वागत करते. अतिशय स्तुत्य हा उपक्रम आहे. मी मेहरुण निवासी असल्याने बोरांच्या रोपांची लागवड व संगोपनाची जबाबदारी यानिमित्ताने स्वीकारते. या प्रकल्पात परिसरातील अधिकाधिक नागरिकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन महापौर जयश्री सुनिल महाजन यांनी केले.

‘मराठी प्रतिष्ठान’तर्फे संपूर्ण जळगावकरांंकरिता शहराचे वैभव असलेल्या मेहरुण तलावाच्या काठावर साकारल्या जात असलेल्या फळबाग व रानमेवा प्रकल्पाचा शुभारंभ सकाळी दहाच्या सुमारास त्यांच्या हस्ते करण्यात आला, याप्रसंगी त्या बोलत होत्या. या प्रकल्पांतर्गत मेहरुण परिसरात 500 फळझाडे व रानमेवा रोपांची लागवड केली जाणार आहे.

माजी आमदार मनीष जैन, जळगाव पीपल्स को-ऑप. बँकेचे चेअरमन श्री.अनिकेत पाटील, विनोद चौधरी, पारस टाटिया, बंटी बुटवानी, नरेश चौधरी, विश्वासराव मोरे, डॉ. बेंद्रे, आनंद मराठे, दाणा बाजार असोसिएशनचे पदाधिकारी,  संतोष क्षीरसागर, भास्कर काळे, प्रकल्पप्रमुख विजयकुमार वाणी, ‘मराठी प्रतिष्ठान’चे अध्यक्ष अ‍ॅड.जमील देशपांडे, सतीश रावेरकर, अनुराधा रावेरकर, संध्या वाणी, निलोफर देशपांडे, विद्या चौधरी, प्रा.सविता नंदनवार यांच्यासह जळगाव शहरातील असंख्य पर्यावरणप्रेमी उपस्थित होते. याप्रसंगी मनीष जैन व अनिकेत पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.

प्रकल्पप्रमुख श्री.विजयकुमार वाणी म्हणाले, की संपूर्ण जळगावकरांंकरिता शहराचे वैभव असलेल्या मेहरुण तलावाच्या काठावर येथील ‘मराठी प्रतिष्ठान’तर्फे फळबाग व रानमेवा प्रकल्प साकारला जात आहे. प्रकल्पांतर्गत या परिसरात 500 फळझाडे व रानमेवा रोपांची लागवड केली जाणार आहे. यासाठी गेल्या शुक्रवारी, दि. 2 जुलै 2021 रोजी सकाळी प्रकल्प परिसराला जिल्हाधिकारी अभिजित राऊत व महापौर जयश्री सुनिल महाजन, आमच्या ‘मराठी प्रतिष्ठान’चे अध्यक्ष अ‍ॅड.जमील देशपांडे, अनुराधा रावेरकर, प्रा.सविता नंदनवार, पिरजादे, मतीन पटेल, प्रतिष्ठानचे स्वयंसेवक सहकारी बंधू-भगिनी व पर्यावरणप्रेमींनी पाहणी केली होती. या प्रकल्पांतर्गत सीताफळ, रामफळ, जगप्रसिद्ध मेहरुणची बोरे तसेच महाबळेश्वरची मलबेरी (सैतू), नाशिकचे करवंद व बर्‍हाणपूरची गोड खिरणी अशा रानमेव्याची लागवड केली जाईल. सदरचा प्रकल्प हा लोकसहभागातून साकारला जात असून, पाच वर्षे या रोपांची जोपासना ‘मराठी प्रतिष्ठान’ करेल. साधारणपणे दुसर्‍या वर्षापासून काही झाडांना फळधारणा होईल व उर्वरित झाडांना तिसर्‍या, चौथ्या व पाचव्या वर्षापासून फळधारणा होईल. ही सर्व रोपे जैन नर्सरीतून आणली असून, ती दीड फूट उंचीची व एक वर्ष वयाची आहेत. त्यांच्या लागवडीसाठी पाचशे खड्डे खोदले जाऊन त्यात कीटकनाशक, जैविकखत टाकले गेल्यानंतर रोपांची लागवड होईल. संगोपनासाठीही यंत्रणा असणार असून, रोपांना टँकरद्वारे पाणी दिले जाईल. त्यानंतर जळगाव शहरातील नागरिकांना या फळांचा व रानमेव्याचा आस्वाद घेता येईल. नागरिकांनी एकदा या प्रकल्पाला अवश्य भेट द्यावी. तसेच सदर प्रकल्पात वृक्ष दत्तक योजनाही असून, नागरिकांना यात सहभाग नोंदविता येईल. त्यासाठी ‘मराठी प्रतिष्ठान’शी संपर्क साधावा.