सर्वसामान्यांना दिलासा! खाद्यतेलाचे भाव घसरले..

जळगाव लाईव्ह न्युज ! १४ नोव्हेंबर २०२२ ! खाद्यतेलांच्या किमतीत चढ उतार होत असल्याचे दिसून येत आहे. ऐन सणासुदीत खाद्यतेलाच्या किमतीत वाढ झाल्याने सर्वसामान्यांचे किचन बजेट कोलमडून गेलं आहे. मात्र सध्या डॉलरच्या तुलनेत रुपया सध्या मजबूत स्थितीत आहे. परिणामी, पाम, पामोलीन सारख्या आयात तेलांचा दर घसरला आहे. या घसरणीमुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

दिल्लीतील खाद्य तेल बाजारात ही घसरण दिसून आली. तिळाचे, पामतेल, पामोलीन तेलाच्या किंमतीत घसरण झाली. तर सोयाबीन, सूर्यफूल यांच्या किंमतीत वाढ झाली आहे. बाजारात या दोन्ही तेलबियांच्या तुटवड्यामुळे ही परिस्थिती उद्धभवल्याचा दावा करण्यात येत आहे.

सोयाबीनचा दर घसरला, शेतकऱ्यांना फटका
तज्ज्ञांच्या मते गेल्या वर्षी शेतकऱ्यांनी ऑगस्ट महिन्यात सोयाबीन जवळपास 10,000 रुपये प्रति क्विंटल भावाने विक्री केले होते. सध्या सोयाबीन 5,500-5,600 रुपये प्रति क्विंटल दराने विक्री होत आहे. हा दर गेल्या वर्षीच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. यंदा शेतकऱ्यांना बियाणे महाग मिळाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना यंदा फटका बसला.

आता या सर्वांचा परिणाम अर्थातच रिफाईंड तेलावर पडणार आहे. रिफाईंड तेलाचे दर घसरणार आहेत. तर सोयाबीनच्या किंमती अजून कमी झालेल्या नाहीत. शेतकरी जोपर्यंत बाजारात साठा आणत नाही. तोपर्यंत तेलाचे भाव कमी होण्याची शक्यता कमी आहे. शेंगदाणा तेल आणि कापासाच्या बियांचे तेलाचे दर घसरले आहेत. येत्या काही दिवसात बाजारात या तेलबिया येण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम बाजारातील साठ्यावर होणार आहे. त्यामुळे तेलाची आवक वाढवून स्वस्ताई येऊ शकते.