Savda News । जळगाव लाईव्ह न्यूज । ३० ऑक्टोबर २०२२ । शहरातील एका तरुणाने इन्स्टाग्राम या सोशल मिडीया साईटवर एका समाजाबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद शहरात उमटले. संतप्त जमावाने शनिवारी रात्री साडेनऊ वाजता सावदा पोलिस ठाणे गाठून दोषीवर कारवाईची मागणी केली तर पोलिसांनी कारवाईचे आश्वासन देत जमावाला पांगवल्यानंतर संतप्त जमावाने रस्त्यावर उभ्या असलेल्या दोन दुचाकीसह एका चारचाकीची तोडफोड केल्याने शहरात प्रचंड तणाव पसरला. सावदा पोलिसांनी तातडीने गावात कुमक तैनात करीत परीस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी जमावाविरोधात तसेच आक्षेपार्ह पोस्ट टाकणार्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
सूत्रांच्या माहितीनुसार, शहरातील तरुणाने एका समाजाविषयी आक्षेपार्ह पोस्ट इन्स्टाग्रामवर पोस्ट केली होती. ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर एका समाजाचे लोक संतप्त होवून पोलिस ठाण्याबाहेर जमले व तरुणाविरोधात कारवाईची मागणी करण्यात आली. पाहता-पाहता मोठ्या प्रमाणावर जमाव जमल्याने परिस्थिती चिघळत जात असल्याचे पाहून सावदा सहा.निरीक्षक डी.डी.इंगोले यांनी जमावाला कारवाईचे आश्वासन देत पांगवल्यानंतर संतप्त जमावाने गांधी चौक, चांदणी चौक आदी भागातील दोन दुचाकीसह एका चारचाकीच्या काचा फोडल्या.
या प्रकाराची माहिती मिळताच सावदा पोलीस स्थानकाचे एपीआय देविदास इंगोले व सहकार्यांनी यांनी घटनास्थळी धाव घेतली. जिल्हा मुख्यालयातून अतिरिक्त कुमक मागवून परीस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. दरम्यान, आक्षेपार्ह पोस्ट टाकणार्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास ताब्यात घेण्यात आले असून तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणार्या जमावाविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन संशयीतांना ताब्यात घेण्यात आले आहे. सावदा शहरातील स्थिती नियंत्रणात असून कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.