शासकीय जमिनीवर लावला भोगवटा; डोंगरकठोरा ग्रा.पं.ला प्रांताधिकाऱ्यांनी बजावली नोटीस
जळगाव लाईव्ह न्यूज । १६ ऑक्टोबर २०२१ । यावल तालुक्यातील डोंगरकठोरा ग्रामपंचायतीच्यामाध्यमातुन गाव हद्दीतील शासकीय जमीन ही रितसर गावठाणाची कार्यवाही न करता भोगवटादार लावुन गांव नमुना ८ तयार केल्याप्रकरणी फैजपुर विभागाचे प्रांताधिकारी कैलास कडलग यांनी यावल पंचायत समितीचे ग्रामविस्तार अधिकारी व डोंगरकठोरा ग्रामपंचायतीस नोटीस बजावली आहे. त्यामुळे डोंगरकठोरा आणि परिसरात खळबळ उडाली आहे.
या संदर्भात प्रांताधिकारी कैलास कडलग यांनी मागील आठवड्यात यावल पंचायत समितीचे ग्रामविस्तार अधिकारी व डोंगरकठोरा ग्रामपंचायतीला पत्र पाठवले आहे. या पत्रात असे नमुद केले आहे की, डोंगरकठोरा (ता.यावल) या गावाच्या ग्रामपंचायत हद्दीत शासकीय जमीन असलेली गावठाण जागेची रितसर परवानगी न घेता भोगवटादार लावुन गाव नमुना ८ अ तयार केल्याबाबत तक्रार प्राप्त झाल्याच्या अनुषंगाने तसेच सोबत डोंगर कठोरा येथील नमुना ८ अ ची संचिका दाखल आहे. या संदर्भात प्रांतधिकारी कैलास कडलग यांनी संबधीतांना नोटीस बजावुन संपुर्ण कागदपत्रांसह तीन दिवसाच्या आत हजर राहावे, अशी सुचना नोटीसीद्वारे दिलीआहे. तसेच सदरचा खुलासा मुद्दतीत प्राप्त न झाल्यास आपल्याविरुद्ध कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, अशीही सूचना नोटीसीव्दारे दिली आहे. यासंदर्भात प्रांत कार्यालयाकडुन कुठल्या प्रकारची कार्यवाही करण्यात आली हे मात्र गुलदस्त्यात आहे.
ग्रामस्थांमध्ये चर्चेला उधाण
डोंगरकठोरा ग्रामपंचायतीच्या कारभाऱ्यांनी अतिशय बेजबाबदारीने वागून ग्रामस्थांना पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळवुन देण्याच्या नावाखाली मोठा आर्थिक व्यवहार करून, शासकीय नियम धाब्यावर ठेवुन हा कारभार केल्याची परीसरातील ग्रामस्थांमध्ये चर्चा रंगली आहे. यासर्व कारभाराची सीईओ व गटविकास अधिकारी यांनी चौकशी करून, सत्य समोर आणावे, अशी मागणी विविध सामाजीक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी तक्रारी अर्जाव्दारे केली आहे.